माझ्यात अतींद्रिय शक्ती, तुमचा आजार बरा करतो! म्हणणाऱ्या भोंदूबाबाच्या प्रतापाचे पितळ उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:14 IST2025-02-19T17:13:21+5:302025-02-19T17:14:46+5:30

तिघांना ठोकल्या पोलिसांनी बेड्या : ५५ हजारांनी भोंदू बाबाने केली व्यक्तीची फसवणूक

The brazen bravado of the impostor who claimed to have supernatural powers and cure your illness! | माझ्यात अतींद्रिय शक्ती, तुमचा आजार बरा करतो! म्हणणाऱ्या भोंदूबाबाच्या प्रतापाचे पितळ उघड

The brazen bravado of the impostor who claimed to have supernatural powers and cure your illness!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
माझ्यात अतींद्रिय शक्ती आहे. चमत्कार करून तुमच्या पायाचा आजार बरा करतो, असे म्हणत भोंदू बाबाने व्यक्तीकडून ५५ हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. महिलेने सतर्कता दाखवत डायल ११२ ला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून भोंदू बाबासह दोघांना अटक करून शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. सलाउद्दीन अब्दुल हफीज, अजीजन सलाउदीन अब्दुल हफीज, सायरा बानो शरीफ सर्व रा. राजस्थान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.


प्रकाश पुंडलिक शिंदे (६५, रा. सुदामपुरी) यांचा उजव्या पायाचा गुडघा दुखत असल्याने त्यांना त्रास होता. अनेक उपचार करूनही आजार बरा होत नव्हता. अखेर त्यांना त्यांच्या घराजवळ एकाने आवाज देत माझ्यात अतींद्रिय शक्ती आहे. मी तपस्या करून ती मिळवली आहे. तुमच्यावर कुणीतरी जादूटोणा केला असून, पाय दुरुस्त करण्यासाठी ८५ हजार रुपये लागतील, असे म्हणाला. व्यक्तीचा विश्वास संपादन करून ५० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, व्यक्तीला फसवणूक झाल्याचे कळताच त्याने माहिती डायल ११२ वर दिली आणि पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला.


तोंडात नळी घेत काढले अशुद्ध रक्त
प्रकाश शिंदे यांच्या गुडघ्याला आरोपींनी तेल लावले. एका ग्लासमधील पाण्यावर मंत्र मारून ते त्याने जवळ ठेवले. प्लास्टिकची पोकळ नळी गुडघ्याला लावून त्यातून काहीतरी लाल द्रव्य बाहेर काढले. हे अशुद्ध रक्त असून तुमचा पाय दुरुस्त करतो, असे म्हणत विश्वास संपादन करून पैसे उकळले. मात्र, दुसऱ्या दिवशीही पाय दुखत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.


महिलेकडे तीन वेगवेगळे आधार कार्ड; फुटले बिंग
प्रकाश शिंदे घराबाहेर बसले असताना त्यांना आरोपी भेटले. त्यांनीदेखील आम्ही तुमचा पाय दुरुस्त करून देतो, असे सांगितले. प्रकाश यांना संशय आल्याने त्यांनी त्यांना घरात बोलवत पाच हजार रुपये दिले आणि जुना व्हिडीओ दाखवला. तेव्हा आरोपी घाबरले. आरोपींनी ते सर्व जण आमच्याच टोळीतील असून आम्ही पैसे परत करतो, असेही सांगितले. त्यांनी ५० हजार रुपये प्रकाश यांना परत केले. मात्र, आणखी कुणाची फसवणूक होऊ नये, म्हणून त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. 

Web Title: The brazen bravado of the impostor who claimed to have supernatural powers and cure your illness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा