अंगणवाडी सेविका घरी येणार आणि लाडक्या बहिणीच्या घरात कार आहे का तपासणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:07 IST2025-03-20T18:05:32+5:302025-03-20T18:07:04+5:30

जिल्ह्यातील सव्वातीन हजार लाडक्या बहिणी रडारावर : कुटुंबामध्ये वाहन आढळल्यास लाभ होणार बंद, वरिष्ठांकडून आदेश, लवकरच अंमलबजावणी

The Anganwadi worker will come to the house and check if there is a car at the house of her beloved sister! | अंगणवाडी सेविका घरी येणार आणि लाडक्या बहिणीच्या घरात कार आहे का तपासणार!

The Anganwadi worker will come to the house and check if there is a car at the house of her beloved sister!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या घरी कार आहे अथवा नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आरटीओकडून अंगणवाडी सेविकांना सव्वातीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोहोचती करण्यात आली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली. यावेळी अर्ज करताना निकषासंदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आले होते. यात कुटुंबात चारचाकी वाहन नसलेल्या महिला योजनेसाठी पात्र होत्या. मात्र, अर्जाची पडताळणी न करताच सरसकट लाभदेण्यात आला. सरकारने कार असलेल्या लाभार्थीनी स्वयंप्रेरणेने लाभ सोडावा, असे आवाहन केले होते. मात्र, कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिंणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. यात सत्यता आढळल्यास लाभ रद्द केला जाणार आहे.


विभक्त राहणाऱ्या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ
कुटुंबातील सासरे, दीर अथवा इतर नातेवाइकांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र राहत असल्यास, त्यांना योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.


सव्वा तीन हजार अर्ज 
महिला बालकल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या घरी कार आहे का, याच्या तपासणीला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले आहेत. आरटीओकडून मिळालेली यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सव्वातीन हजार लाभार्थी महिलांची तपासणी केली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 


अंगणवाडी सेविका व आरटीओकडे यादी
महिला व बालकल्याण विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना असणाऱ्याची यादी मिळवली आहे. या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चारचाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची खातरजमा करणार आहे. कार चालविण्याचा परवाना आहे. मात्र, दुसऱ्याची कार चालविणाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे.


चारचाकी नावावर असलेल्यांची नावे उडविणार
शासनाने लाभ देताना महिलांकडून हमीपत्र भरून घेतले होते. यात चारचाकी कार नसल्याचे नमूद केल्याने त्यांना लाभ देण्यात आला होता. मात्र, ज्यांच्या नावावर कार आहे, असेही लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांना लाभसोडण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता प्रत्यक्ष पडताळणीत अशी नावे कमी केली जाणार आहेत.


कोणत्या तालुक्यात किती लाडक्या बहिणींची चौकशी?
तालुका                 तपासणीसाठी आलेले अर्ज

आर्वी                             ३३३
आष्टी (श)                     १३९
कारंजा (घा)                  ११७
देवळी                          २४६
वर्धा                             १००४
समुद्रपूर                        ४२२
सेलू                              २८७
हिंगणघाट                     ६७४


५ एकर शेती, शासकीय नोकरी नको; उत्पन्नाची अट अडीच लाखाची
योजनेच्या लाभासाठी अल्पभूधारक शेतकरी, शासकीय नोकरी, अडीच लाख रुपयांची उत्पन्नाची अट ठेवण्यात आली होती. मात्र, आता पडताळणीत निकषाची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना कमी केले जाणार आहे.


 

Web Title: The Anganwadi worker will come to the house and check if there is a car at the house of her beloved sister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.