'पोषणआहाराच्या' खिचडीतून विद्यार्थ्यांना विषबाधा; ३७ विद्यार्थी, २ शिक्षक रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:11 IST2024-12-12T17:11:00+5:302024-12-12T17:11:57+5:30

१८ जणांना सुटी: वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार

Students poisoned by 'nutritional' khichdi; 37 students, 2 teachers in hospital | 'पोषणआहाराच्या' खिचडीतून विद्यार्थ्यांना विषबाधा; ३७ विद्यार्थी, २ शिक्षक रुग्णालयात

Students poisoned by 'nutritional' khichdi; 37 students, 2 teachers in hospital

लोकमत न्यूज नेटवर्क 
हिंगणघाट :
तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहाराअंतर्गत देण्यात येणारी खिचडी खाल्ल्यामुळे ५७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना विषबाधा झाली. यापैकी ३७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, ते सध्या डॉक्टरांच्या निगराणीत असून, १८ जणांना सुटी देण्यात आली. दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेन पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ८७ असून सोमवारी, दि. ८ रोजी शाळेत ८५ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मोड आलेली मोट व खिचडी नेहमीप्रमाणे देण्यात आली. हीच खिचडी मुख्याध्यापक व शिक्षकांनी नियमानुसार प्रथम खाऊन तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना खाण्यास दिली. मात्र, तेव्हापासूनच रात्रीला, तसेच मंगळवारी देखील सकाळच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना ताप, थंडी आणि अस्वस्थ वाटत असल्याने विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. मात्र, दुपारी शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना उलट्या, ताप, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने पालक कामावरून घरी पोहोचल्यावर धावपळ सुरू झाली. रात्री ८ वाजेपासून एकूण ५७ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी ३७ जणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण पोहणे व शिक्षिका त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून, काहींना डोकेदुखी व ताप असल्याने ते निगराणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई: रहमान 
विषबाधा प्रकरणात माध्यान्ह भोजनातून देत असलेले अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान यांनी दिली. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. नितू गावंडे आदींनी उपचार घेत असलेले विद्यार्थी, शिक्षकांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी शाळेलासुद्धा भेट दिली. रुग्णालयात दाखल असलेल्या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील असे जतिन रहमान यांनी सांगितले. तसेच यापुढे आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


आमदार समीर कुणावार यांच्याकडून कुटुंबीयांना धीर 
दुर्देवी घटनेची आमदार समीर कुणावार यांनी दखल घेत आरोग्य विभाग व शिक्षण विभागाला तातडीची मदत देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले. ११ रोजी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन उपचारार्थ दाखल विद्यार्थ्यांच्या समस्या जाणल्या. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान, डॉक्टर नाईक सर, हिंगणघाट पंचायत समिती विस्तार अधिकारी, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयच्या अधीक्षक डॉ. मिसार, डॉ. राहुल भोयर, अपूर्व पीरके, डॉ. कांबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुजर उपस्थित होते.


"उपजिल्हा रुग्णालयात भरती ३७ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ते धोक्याबाहेर आहेत. मात्र, काहींना डोकेदुखी व ताप असल्याने निगराणीखाली ठेवले आहे. त्यांना २४ तासांनंतरच सुटी देण्यात येईल." 
- डॉ. समीर पाटील, बालरोगतज्ज्ञ, हिंगणघाट


"मोड आलेली मोट व खिचडी तयार करण्यात आल्यानंतर आम्ही तपासली व नंतर विद्यार्थ्यांना दिली. तेव्हापासून २४ तासांत विषबाधेचे कोणतेही लक्षण आढळले नाही. मंगळवारी दुपारी माझ्यासह विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात, तर हृदयविकाराचा रुग्ण असल्याने खासगीत तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेत आहे." 
- अरुण पोहणे, मुख्याध्यापक, वाघोली.

Web Title: Students poisoned by 'nutritional' khichdi; 37 students, 2 teachers in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.