भाजीपाल्याचे दर कडाडले, लसूण १२० रुपयाला पावभर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:18 IST2024-09-19T16:17:39+5:302024-09-19T16:18:58+5:30
महागाईचा भडका : गृहिणीचे बजेट कोलमडले, सर्वसामान्यांचे हाल

Prices of vegetables are so high, garlic for 120 rupees a piece
पुरुषोत्तम नागपुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सध्या भाजीपाला व धान्याचे भाव गगनाला भिडल्याने, मध्यम वर्ग व गरिबांना महागाईचा फटका बसत आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. यावर्षी पावसामध्ये उघडझाप असल्यामुळे भाजीपाल्यांची आवक कमी होऊन भावात प्रचंड तेजी आली आहे. १२० रुपयाला लसूण पावभर मिळत आहे. अद्रक, कांदे, मिरची, टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी, फुलकोबी, कोथिंबीर यांचे भाव कडाडले असून इतर भाजीपालाही महाग झाला आहे.
जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढत असताना टोमॅटोच्या भाववाढीमुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. रोजच्या आहारातील कांद्याचे भाव सुद्धा गगनाला भिडत असल्याने, कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झाला असला तरी दलालांनी त्यालाही अंधारात ठेवून आपलं चांगभलं केले आहे. तद्वतच इंधनापासून गॅस सिलिंडरची किंमत सुद्धा वाढल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे. वातावरणातील नैसर्गिक चक्राच्या बदलामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसत असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र लहान मोठ्या शहरांमध्ये व विशेषतः ग्रामीण भागामध्ये भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
आता टोमॅटो ६० रुपये किलो, अद्रक २५० रुपये, मिरची २०० रुपये, कोथिंबीर ४०० रुपये, गवार १०० रु., कारले ८० रुपये, शेवग्याच्या शेंगा १०० रुपये, भेंडी ८० रुपये, असे भाव पाहायला मिळत आहेत. बहुधा येणारे एक-दोन महिने भावात घसरण होण्याची शक्यता दिसत नाही. मटण, मासे, डाळीचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. तूरडाळीचा भाव गगनाला भिडला असून तूरडाळ १६० रुपये दराने विकत घ्यावी लागत आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्यांचे दर इतके कोसळले होते की बाजारातून टोमॅटो फेकून देण्याची वेळ कास्तकार बंधूंवर आली होती.
आता मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत असला तरीही बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट झालेली आढळून येत आहे. म्हणून भाववाढ होत असली तरीही बळीराजाच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. त्यामुळे या भाववाढीवर नियंत्रण येणे गरजेचे आहे. साठेबाजी करणाऱ्या तथाकथित दलालांना वठणीवर आणणे गरजेचे झाले आहे.