वर्धा जिल्ह्यातील पावसामुळे सात हजारांहून जादा घरांची पडझड, आर्थिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 20:10 IST2025-08-11T20:09:09+5:302025-08-11T20:10:09+5:30
Wardha : यावर्षी दोन महिन्यात ४ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रवरील पिकांचे नुकसान

More than seven thousand houses collapsed due to rains in Wardha district, causing financial loss
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हवामान बदलत चालले आहे. कधी अवकाळी पावसाचा फटका, तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पावसाळमुळे सन २०२१ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील ७ हजार ७७५ घरांची पडझड झाली, तर १३० घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात १२ नद्या व अनेक नाले पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीनंतर तुडुंब वाहून आजूबाजूच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण करतात. जिल्ह्यात मुख्यत्वे मान्सूनमध्ये पूर येतो. थोड्या जलमार्गावर अतिक्रमण, अपुरी ड्रेनेज कालावधीत येणाऱ्या अतिवृष्टीमुळे, क्षमता, नाल्यांची देखरेख न करणे, यामुळे पूरस्थिती ओढवते. तसेच अलीकडे मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहे. यामुळे अनेक रस्ते, नाल्या खोदून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सोबतच जिल्ह्यातील काही नागरिकांचे अजूनही मातीचे घर आहेत. यामुळे संततधार पावसामुळे या घरांना अधिक धोका निर्माण होत असतो. सन २०२१ पासून आजपावतो या कालावधीत तब्बल ७ हजार ७७५ घरांची पडझड झाली आहे, तर १३० घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून त्यांना मदत देण्यात आली आहे, तर यावर्षी जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या घरांची पडझडाची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दोन महिन्यांत ४ गोठ्यांचे झाले नुकसान
सन २०२५ मध्ये जून व जुलै या दोन महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे एकूण ४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
४ हजार ३१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
यावर्षी जूनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, अतिवृष्टीमुळे जून महिन्यातील पावसामुळे ७१६ हेक्टर व जुलै महिन्यात ३ हजार ५९६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
२८१ पशुंची झाली हानी
जिल्ह्यात सन २०२१ पासून ते सन २०२५ च्या जुलै महिन्यापर्यंत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे लहान पशू ९३, तर मोठे पशू १८८, असे एकूण २८१ पशुंची हानी झालेली आहे.
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले वार्षिक नुकसान
हानीचा प्रकार २०२५ २०२४ २०२३ २०२२ २०२१
मनुष्य हानी मृत ०२ १० ०८ २१ १२
जखमी ०० ०५ १० १० ०५
घरांचे नुकसान अंशतः १६४ १०८५ ६२१ ५२३३ ६०२
पूर्णतः ०० ०३ ३५ ८० १३
पशूधन हानी लहान ०३ ०८ १४ ५७ ११
मोठी ०४ ४४ ३३ ७८ २९