कौटुंबिक संघर्षात पुरुषही होतात पीडित; तक्रारींचा ओघ वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 18:44 IST2025-05-02T18:43:25+5:302025-05-02T18:44:20+5:30

'भरोसा सेल'कडे तीन महिन्यात ३४ तक्रारी : गेल्या वर्षात अनेकांचा झाला समझोता, समुपदेशातून होतो निपटारा

Men are also victims in domestic violence; the number of complaints is increasing | कौटुंबिक संघर्षात पुरुषही होतात पीडित; तक्रारींचा ओघ वाढतोय

Men are also victims in domestic violence; the number of complaints is increasing

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
बदलत्या जीवनशैलीत निर्माण होणाऱ्या कौटुंबीक वादात महिलांप्रमाणेच भरडल्या जाणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मानसिक छळ, खोट्या आरोपांची भीती आणि नात्यांतील तडजोडीत त्यांचा सर्वाधिक बळी जाताना दिसत आहे.


पोलिसांच्या 'भरोसा सेल'कडे दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये आता पुरुषांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या तीन महिन्यात कौटुंबीक त्रासाने ग्रासलेल्या ३४ पुरुषांनी त्याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.


मागील वर्षी २०२४मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे ५०८ तक्रारी दाखल झाल्या. यात पुरुषांच्या तक्रारींचीही नोंद होती. त्या सर्व प्रकरणांत भरोसा सेलने समुपदेशनातून मार्ग काढत समझोता करून दिला. आकडेवारीवर नजर टाकली, तर दर पाच तक्रारींपैकी एक तक्रार पुरुषाने केली असल्याचे आढळून येते. घरगुती वाद आणि मानसिक त्रास याबाबतीत महिलांचे प्रमाण जास्त असले, तरी पुरुषांनाही अन्याय सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 


अनेक प्रकरणं न्यायालयात, घटस्फोटाचे प्रमाणही वाढलेत...
विशेष म्हणजे चालू वर्षाच्या (२०२५) पहिल्या तीन महिन्यात भरोसा सेलकडे एकूण २५८ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातही ३४ पुरुषांच्या तक्रारींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ तीन महिन्यांत पुरुषांकडून तक्रारी दाखल होण्याचा आकडा लक्षणीय आहे आणि तो सातत्याने वाढत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते. अनेक प्रकरणे न्यायालयात गेली आहेत. त्यांच्याकडून घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला आहे. मागील तीन महिन्यांत अनेकांचे घटस्फोटही झाले आहेत. मात्र, तरीही भरोसा सेलकडून संसार जुळविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहेत.


१२ प्रकरणांत पोलिसांनी समुपदेशनातून केला समझोता
भरोसा सेलकडे दाखल झालेल्या पुरुषांच्या ३४ तक्रारींपैकी १२ तक्रारींचा समुपदेशनाने समझोता करण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणांत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भरोसा सेलकडून मिळाली.


पुरुषही ठोठावताहेत 'भरोसा'चा दरवाजा
विविध प्रकरणांत पुरुषांना घरगुती हिंसाचार, खोटे आरोप, मानसिक त्रास यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. फारच बिकट परिस्थितीत पोहचल्यावर ते 'भरोसा सेल'चा दरवाजा ठोठावत आहेत. एकूणच महिलांसोबतच पुरुषांनाही समुपदेशन आणि न्याय मिळवून देण्यासाठी भरोसा सेल महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Web Title: Men are also victims in domestic violence; the number of complaints is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.