आर्वीतील 'पॉवर स्टेशन'ला भीषण आग; लाखोंच्या नुकसानीचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:28 IST2024-11-28T17:26:54+5:302024-11-28T17:28:22+5:30
Vardha : एक किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ आकाशात उमटले

Massive fire at 'Power Station' in Arvi; Damages estimated in the millions
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी (वर्धा) : आर्वीतील वर्धा मार्गावरील महावितरणच्या १३२ केव्हीच्या पॉवर स्टेशनला २७ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, एक किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ उठलेले आकाशात दिसत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र, वृत्त लिहिस्तोवर समजले नव्हते. घटनास्थळी महावितरणचे अभियंताही पोहोचले होते. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दूर अंतरावरूनच आकाशात आगीचे लोळ उठताना दिसून येत होते. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती आर्वी पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला तसेच पुलगाव येथील सीएडी कॅम्पमधूनही अग्निशमन बंब बोलावण्यात आला होता.
या आगीत 'महावितरण'चे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे रौद्ररूप बघता आष्टी आणि पुलगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना बंबासह पाचारण केले होते. 'महावितरण'च्या पॉवर स्टेशनला आग लागल्याने आर्वी शहरासह तालुक्यातील काही गावांमधील नागरिकांच्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे अख्खे आर्वी शहर व लगतची गावे रात्रभर अंधारात होती. मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
महावितरणच्या पॉवर स्टेशनला आग लागल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनीदेखील उपस्थिती लावत नागरिकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृत्त लिहिस्तोवर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाले नव्हते.