तृतीयपंथीशी लग्नाचा तगादा, नकार देताच केला चाकूने हल्ला; वर्ध्यातील घटना
By चैतन्य जोशी | Updated: September 29, 2022 17:22 IST2022-09-29T17:16:15+5:302022-09-29T17:22:11+5:30
आरोपीस अटक

तृतीयपंथीशी लग्नाचा तगादा, नकार देताच केला चाकूने हल्ला; वर्ध्यातील घटना
वर्धा : मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु मला आवडते, त्याने तृतीयपंथीकडे असा तगादा लावला. तृतीयपंथीने समजून घालत नकार दिला असता, संतापलेल्या विकृताने जवळील चाकू काढून तृतीयपंथीच्या हातावर वार करीत जखमी केले.
ही धक्कादायक घटना स्वावलंबी मैदानावर दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी २८ रोजी रामनगर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्याची माहिती दिली. मंगेश उर्फ बालु मनोहर सौरंगपते रा. केळकरवाडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
३३ वर्षीय तृतीयपंथी ही स्वावलंबी मैदानातून तिच्या घरी जात असताना आरोपी मंगेश उर्फ बालू हा रस्त्यात भेटला दोघेही एकमेकासोबत बोलत असतानाच आरोपी बालूने तृतीयपंथीला तु माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला. तृतीयपंथीने त्याची समजूत काढून तुला दोन मुलं आहे पत्नी आहे, मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही, असे म्हटले. यावेळी रागाच्या भारात बालूने जवळील चाकू काढून तृतीयपंथीच्या हातावर व पायावर वार करीत जखमी केले. तृतीयपंथीने तेथून पळ काढून आडोशाला जाऊन लपली. काही वेळाने तृतीयपंथीने रामनार पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी मंगेश उर्फ बालू सौरंगपते यास अटक केल्याची माहिती दिली.