वर्ध्यात उद्योगचक्र गतिमान; १६० उद्योगांना मिळाली चालना, तरुणांनी अर्ज करावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:10 IST2025-01-23T18:09:24+5:302025-01-23T18:10:35+5:30
गतवर्षात उद्योग वाढले : गुंतवणुकीतही झाली मोठी भर

Industrial cycle in Wardha is dynamic; 160 industries have received a boost, youth should apply
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २०२४ मध्ये स्टार्टअप उद्योगांना चालना मिळाली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील तरुणांनी यात सहभागी होत १६० स्टार्टअप उद्योग सुरू केले आहेत. यातून ७ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे, तर यात सहभागी झालेल्या नवउद्योजकांना या योजनेच्या माध्यमातून अनुदानही मिळाले आहे.
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग येण्यास तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना तरुण, नवउद्योजकांनी मात्र, स्टार्टअप उद्योगांची कास धरली आहे. छोट्या मोठ्चा व्यवसाय, उद्योगांच्या माध्यमातून सक्षम होण्याचा प्रयत्न तरुण उद्योजक करत आहे. सध्या जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीत विस्तारासाठी जागेची अडचण आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे, तेथे दळणवळण, पाणी आदी सुविध उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात मोठा उद्योग आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
मंजुरी देण्यास बँकांची टाळाटाळ
जिल्हा उद्योग केंद्राकडे २ हजार २१५ नव उद्योजकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यापैकी १ हजार ३९४ अर्ज मंजुरीसाठी विविध बँकांकडे पाठविण्यात आले होते. बँकांनी यापैकी १६० उद्योग अर्जाना मंजुरी दिली. तर ६८१ अर्ज 'रिजेक्ट' केले. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी असतानाही प्रलंबित असलेल्या ७१३ अर्जाना मंजुरी देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे बँकांन देखील हात आखडता न घेता ढिला सोडण्याची गरज आहे.
या व्यवसायासाठी मिळते कर्ज...
जिल्हा उद्योग केंद्राकडून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारीत उद्योग, ई वाहतूक व त्यावरील आधारीत व्यवसाय, फिरते विक्री केंद्र तसेच खाद्यान्न केंद्रा आदी उद्योग व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. तीन वर्षापर्यंत उद्योग सुरु असल्यास अनुदान मिळू शकते.
६०० उद्योग सुरु करण्याचे 'टार्गेट'
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात गतवर्षी जिल्हा उद्योग केंद्राला ६०० उद्योग सुरू करण्याचे टार्गेट होते. आतापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राने जिल्ह्यातील १६० उद्योगांना मान्यता दिली आहे. यासाठी लाखोंचे अनुदानही दिले आहे.
कुटीर उद्योगाला प्रोत्साहन
कुटीर उद्योगाला चालना देण्यासाठीही जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रयत्न होत आहेत. घरगुती शेती उत्पन्न व शेती प्रक्रिया उद्योगांचा यात समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यामुळे नव उद्योजकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
तरुण, नव उद्योजकांनी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेऊन आपला स्टार्टअप उद्योग सुरू करून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून ७ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे या स्टार्टअपच्या माध्यमातून जिल्ह्यात छोट्या, मोठ्या उद्योगांना चालना मिळाली आहे, यातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळाली आहे.