जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 17:33 IST2024-10-03T17:33:01+5:302024-10-03T17:33:52+5:30
शासनाच्या धोरणांचा नोंदविला निषेध : सततच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी घेतली भूमिका

Indefinite hunger strike of teachers for old pension
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यभरात १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त सर्व विभागांतील शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, मागणीसाठी महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने, धरणे, आक्रोश मोर्चा, पायदळ दिंडी व संप पुकारला. परंतु, योजना लागू केली नसल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने बुधवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून वर्ध्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व विभागांतील शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी २०१५ पासून सातत्याने आंदोलने, धरणे, आक्रोश मोर्चा, पायदळ पेन्शन दिंडी व संप करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करीत आहे. परंतु, सत्ताधारी मात्र नावे बदलवून नवनवीन अन्यायकारक पेन्शन योजना लागू करीत आहे. शासनाने लागू केलेल्या अन्यायकारक एनपीएस, युपीएस, जीपीएस व आरपीएस यांपैकी एक ही पेन्शन योजना राज्यातील १९ लाख कर्मचारी व पेन्शन फायटर यांना मान्य नाही.
नुकताच राज्य शासनाच्या वित्त विभागाने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय २० सप्टेंबर २०२४ रोजी निर्गमित केला. परंतु, तो शासन निर्णय हा पूर्णपणे अन्यायकारक असून, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची फसवणूक करणारा आहे. त्यामुळे सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय राज्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी व जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनात आमदार सुधाकर अडबाले, सचिव गोविंद उगले, आंदोलन प्रमुख नदीम पटेल, जिल्हा सचिव प्रमोद खोडे, अरविंद सुरोशे, मनोज बाचले, संजय सोनार, प्रवीण बहादे, रामदास वाघ, राजेंद्र ठोकळ, श्रीनाथ पाटील, पांडुरंग पवार, तेजस तिवारी, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, कार्याध्यक्ष आशिष बोटरे, आशुतोष चौधरी, विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, राज्य सचिव गोविंद उगले, राज्य सल्लागार सुनील दुधे, सचिन शंभरकर, मनोज पालीवाल, रितेश निमसडे विनोद वाडीभस्मे, ज्ञानेश्वर निमकर, समीर वाघमारे, गजानन भोंग, अभिजीत पाकमोडे, चंद्रशेखर शेंडे, ओम पिंपळकर, मंगेश भोमले, शशिमोहन थुटे, आशिष रमधम, महिला आघाडी प्रमुख अश्विनी वानखेडे, सीमा खेडकर, अश्विनी इंगोले, अश्विनी धोंगडे, योगिता सोरते, पूजा झाडे, धनंजय कापसे, नितीन खराबे, अमोल गेडाम, जितेंद्र दडमल, अरविंद भोसकर, ओम बिडवाइक, नीलेश चौधरी, मोहीम शेख, अमोल पोले, संजय जाधव, चंद्रकांत मुटकुळे, धीरज चंदेल, सतीश धारपुरे, बी. एल. पंडीत, तुषार शिंदे, अमर गोरे, अरविंद राठोड, मोहित हुसुकले, प्रदीप भट यांच्यासह पेन्शन फायटर उपस्थित होते.