नियमबाह्यरित्या पदभरती करणे भोवले, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द

By आनंद इंगोले | Updated: July 18, 2023 17:56 IST2023-07-18T17:53:48+5:302023-07-18T17:56:27+5:30

समाजकल्याण आयुक्तांचा आदेश

Illegal recruitment, Derecognition of Aniket College of Social Work cancelled | नियमबाह्यरित्या पदभरती करणे भोवले, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द

नियमबाह्यरित्या पदभरती करणे भोवले, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द

वर्धा : येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयात पदभरती करताना शासकीय नियमांना बगल दिल्याची तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात सन २०१४ मध्ये पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांनी चौकशी समिती गठीत केली होती. अखेर या चौकशीअंती समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे वर्ध्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

अनिकेत शिक्षण संस्था, दिघोरी जि. भंडारा या संस्थेंतर्गत वर्ध्यात अनिकेत समाजकार्य महाविद्यालय चालविले जात आहे. संस्थेने वर्ध्यातील महाविद्यालयात लघुलेखक व वसतीगृह सफाईगार ही दोन्ही पदे भरताना शासकीय नियमांचे पालन केले नसल्याने यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. तसेच आमदार दादाराव केचे यांनी सन २०१४ मध्ये पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रादेशिक उपायुक्तांनी चौकशी समिती गठीत केली होती. चौकशीअंती लघुलेखक व वसतीगृह सफाईगार ही दोन्ही पदे गैरमार्गाने भरल्याने निदर्शनास आले. त्यामुळे वसतीगृह सफाईगार खंडारे यांची सेवासामाप्ती करण्यात यावी. आणि लघुलेखक मेश्राम व खंडारे यांना वेतनापोटी देण्यात आलेले वेतन अनुदान संस्थेकडून वसूल करुन अनिकेत शिक्षण संस्था दिघोरी या संस्थेवर प्रशासक बसविण्याची शिफारस करण्यात आली.

सहायक प्राध्यापक शंभरकरही अडचणीत

अनिकेत महाविद्यालय, वर्ध्याचे सहायक प्राध्यापक डॉ. बाबा शंभरकर यांना गुणवाढ प्रकरणात न्यायालयाने शिक्षा व दंडाचे आदेश देऊनही त्यांना सेवेत ठेवून वेतन आहरित केल्यासंदर्भात व अद्यापही सेवेत कायम असल्याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार डॉ. बाबुराव कºहाडे यांनी उपलोक आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयाने चौकशी अहवाल आयुक्तालयास सादर केला असून या संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यासोबतच महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

वेतन अनुदान व इतर अनुदान तात्काळ बंद करा

अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्दचा आदेश प्राप्त होताच या महाविद्यालयास देण्यात येणारे वेतन अनुदान व इतर अनुदान तात्काळ प्रभावाने बंद करावे, असे निर्देश वर्ध्याच्या सहायक आयुक्त, समाजकल्याण यांना दिले आहे. या महाविद्यालयात चालु शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून सहायक आयुक्तांनी विद्यापीठाशी विचारविनिमय करुन त्यांचे प्रवेश इतर महाविद्यालयात वर्ग करावेत, असेही सांगितले आहे.

या सर्व प्रकरणामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद तथा कर्मचाºयांचा काही दोष नाही. सध्या २३० विद्यार्थी व ३२ कर्मचारी असून संस्था या सर्वांच्या पाठीशी आहे. त्यामुळे हे महाविद्यालय पूर्ववत सुरु राहावे, याकरिता आमचे प्रयत्न सुरु आहे.

डॉ. मुकेश नंदेश्वर, प्राचार्य, अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, वर्धा.

Web Title: Illegal recruitment, Derecognition of Aniket College of Social Work cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.