स्मार्ट मीटर बसवला तर वीज मिळणार स्वस्त ! ग्राहकांना प्रतियुनिट मिळणार एक रुपया सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:59 IST2024-12-09T17:58:01+5:302024-12-09T17:59:33+5:30
Wardha : जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार ८०९ ठिकाणी लागणार मीटर

If you install a smart meter, you will get cheap electricity! Customers will get one rupee discount per unit
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्मार्ट प्रीपेड वीज मीटरला होणारा विरोध शांत करण्याचा फॉर्म्युला महावितरणला सापडला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना दिवसा स्वस्त वीज देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या माध्यमातून ग्राहकांना प्रतियुनिट एक रुपया सूट मिळणार आहे.
महावितरणला महाराष्ट्र नियामक आयोगासमोर बहुवार्षिक दर याचिका दाखल करणे अनिवार्य आहे. या याचिकेत कंपनीने स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांसह सर्व ग्राहकांना टीओडी (टाइम ऑफ द डे) टॅरिफचा लाभ देण्यासाठीही परवानगी मागितली आहे. जनसुनावणी घेऊन आयोग आता या याचिकेवर निर्णय घेईल. सध्या ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीज भार २० किलोवॉटपेक्षा जास्त आहे त्यांनाच वीज दराचा लाभ दिला जात आहे. याअंतर्गत उद्योगांना रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत १.५ रुपये प्रतियुनिट सवलत दिली जाते.
यावेळी विजेची मागणी कमी असल्याने उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. आता हा टीओडी स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांनाही दरपत्रकाचा लाभ मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सौरऊर्जा मिळते, असे महावितरणचे म्हणणे आहे. त्याचा सरासरी दर ३.२५ पैसे प्रतियुनिट आहे. जो पारंपरिक औष्णिक वीज केंद्रांच्या विजेपेक्षा खूपच स्वस्त आहे. त्याचा फायदा स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. कंपनीचा युक्तिवाद आहे की, सध्या बसवलेले मीटर ग्राहकांच्या तासाभराच्या वापराची माहिती देत नाही, त्यामुळे टीओडी टेरिफचा लाभ देऊ शकत नाही. आता स्मार्ट मीटरवरून ही माहिती मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे घरगुती ग्राहकांची प्रतियुनिट सुमारे एक रुपयाची बचत होईल, असा महावितरणचा दावा आहे.
कोटी रुपये खर्चुन बदलणार ३.९८ लाख मीटर
संपूर्ण राज्यात जवळपास २६ हजार कोटी रुपये खर्चुन २.४१ कोटी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनमध्ये हे मीटर बसविण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र, विरोधामुळे घरगुती ग्राहकांना हे मीटर देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. आता हे निर्बंध हटवून ग्राहकांना टीओडीचा लाभाचा पर्याय दिला जाणार आहे. मोबाइलप्रमाणेच या मीटरमध्ये पोस्ट पेड आणि प्री पेडचीही सुविधा असणार असून, जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार घरात स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे.