पाच हजार रुपयांसाठी विकला इमान; लाच घेतांना लिपिक पकडला रंगेहाथ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:58 IST2025-01-21T17:57:59+5:302025-01-21T17:58:59+5:30
Wardha : मोजणी अहवालासाठी मागितली होती रक्कम

honesty sold for five thousand rupees; Clerk caught red-handed while taking bribe!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विहिरीच्या जागेचा मोबदला मिळण्यासाठी मोजणी अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई वर्ध्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० रोजी केली. नरेश चंद्रकांत जाधव (वय ४८) (दुरुस्ती लिपिक भूकरमापक, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, सेलू) असे अटक केलेल्या लाचखोराचे नाव आहे.
सेलू येथील ६० वर्षीय तक्रारदाराने त्याच्या आईच्या नावाने असलेली शेतजमीन डोरली सर्व्हे क्रमांक ३३ ही सन २०२०- २१ मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी संपादित केली होती. याचा मोबदला मिळण्यासाठी मोजणी अहवालाची आवश्यकता होती.
भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोरी चव्हाट्यावर
जमिनीतील विहिरीच्या जागेचा मोबदला मिळाला नसल्याने त्याबाबत उपअधीक्षक भूमिअभिलेख विभाग यांच्या कार्यालयाकडून पंचनामा करुन त्याचा संयुक्त मोजणी अहवाल उपविभागीय अधिकारी वर्धा यांना पाठविण्यासाठी नरेश जाधव यांनी तक्रारदाराला सहा हजार रुपयांची मागणी केली होती.
ठरल्यानुसार नरेश जाधव याने पाच हजार रुपये स्वीकारले. दरम्यान, त्यास रंगेहाथ पकडून अटक केली. त्याच्याविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैशाली वैरागडे यांच्या निर्देशात पोलिस निरीक्षक अरविंद राऊत, मंगेश गंधे, प्रशांत वैद्य, पंकज डहाके, पंकज टाकोने, गणेश पवार, मेश्राम, राखी फुलमाळी, शीतल शिंदे, प्रशांत मानमोडे, विनोद धोंगडे, मनीष मसराम, लक्ष्मण केंद्रे, प्रीतम इंगळे, बादल देशमुख यांनी केली.