वर्धा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी-नाल्यांना पूर, ४२ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 13:10 IST2022-07-18T11:20:08+5:302022-07-18T13:10:02+5:30
अतिवृष्टीचा वर्धा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला असून पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांचा संपर्क तुटला आहे.

वर्धा जिल्ह्यात पावसाचे थैमान; नदी-नाल्यांना पूर, ४२ गावांचा संपर्क तुटला
वर्धा : जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे. रविवारी सायंकाळ पासूनसुरु असलेला संततधार पाऊस सोमवारी कायम असून अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्याने ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाटसह जिल्ह्यातील नदी काठावरील अनेक गावांना पुराचा वेढा असल्याने युद्धपातळीवर विशेष प्रयत्न करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी हिंगणघाट तालुक्यात एनडीआरएफची एक तर एसडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर बचाव कार्यासाठी एनडीआरएफ अन् एसडीआरएफची चमू वर्धा जिल्ह्यात दाखल झाल्या हे विशेष.
आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे आज १८ जुलै रोजी सकाळी ६.१५ वाजता १०० सेंमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पातून १६२५.१३ घन.मी/से. पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्राच्या दोनही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
देवळी तालुक्यातील सोनोरा ढोक गावात २१ घरांमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांना गावातील वरील भागातील घरांमधे हलवण्यात आले आहे सेलू तालुक्यातील चाणकी-कोपरा गावादरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे. हमदापूर येथे राष्ट्रीय महामार्गच्या कामामुळे काही घरांमधे पाणी घुसले आहे.
बाभूळगाव पुलावरून पाणी सुरू असल्याने रहदारी बंद झाली आहे. काही घरे पाण्याखाली गेली आहेत. हिगणघाट तालुक्यातील हिंगणघाट मंडळात रात्री २११ मीमी पाऊस झाल्याने महाकाली नगर मधील २० घरामध्ये भाकरा नाल्याचे पाणी घुसले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले आहे.
सेलू तालुक्यातील सिंदी ते दिग्रज येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने दिग्रज गावाचा वाहतूक संपर्क तुटलेला आहे. तसेच सिंदी ते पळसगाव बाई येथील वाहतूक संपर्क बंद झाला. तसेच दहेगाव ते पहेलानपुर वाहतूक संपर्क बंद झाला आहे.
बोरखेडी कलालगत असलेल्या नाल्याला पूर आला असुन रोडवरून अंदाजे ३ ते ४ फूट पाणी आहे. ये जा बंद करण्यात आली आहे. पिंपळगाव येथे बोर नदीला पूर गावापर्यंत पाणी शिरले. तुर्त कोणताही धोका नाही. परंतु सर्वत्र पाउस होत असल्याने नदी व नाले तुडूंब भरुन वाहत आहे. चिंचोली लगत असलेल्या नाल्याला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक संपर्क बंद झाला आहे.
आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झालेली आहे. दोन्ही साईडला पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आर्वी शिरपूर रोड खडकीजवळ बंद झाला आहे. हिंगणघाट तालुक्यात कान्होली गावात पाणी शिरले आहे. कुटकी मार्ग, दाभा मार्ग, पिंपळगाव रोड बंद झाला आहे. सोनेगाव कान्होली आलमडोह या गावात पाणी शिरले आहे.
बोर प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले
सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे नऊ दरवाजे सोमवारी दुपारी ४ वाजता ३० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे बोर नदीच्या पात्रात सध्या १३० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून बोर नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आर्वी - तळेगाव मार्ग झाला बंद, वाहतूक खोळंबली
आर्वी तालुक्यात दहा तासापासून सतत सुरू असलेल्या पावसाने नदी नाल्याला पूर आला आहे. आर्वी तळेगाव या मार्गवरील वर्धामनेरी येथील नदीला पूर आल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. या मार्गावरील अमरावती, नागपूर, वरुड, मोर्शी आदी बसेस बसस्थानकात अडकल्या आहेत. नदीचा पूर ओसरल्यावर त्या सोडण्यात येणार असल्याचे एस.टी वाहतूक विभागाने स्पष्ट केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.