शिवसेनेच्या माजी पंचायत समिती सदस्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 13:46 IST2023-02-25T13:43:05+5:302023-02-25T13:46:12+5:30
आजनादेवी गावात हळहळ

शिवसेनेच्या माजी पंचायत समिती सदस्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
कारंजा (घाडगे) : शेती हा व्यवसाय सोबतच शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता. हळूहळू गावाच्या राजकारणात आल्याने सरपंचपद मिळाले होते. विकासाचा ध्यास अंगी बाळगून समाजकार्यात वाहून घेतलेल्या या व्यक्तीने पंचायत समितीचे सदस्यपदही पदरी पाडले होते. समाजकारण, राजकारण आणि आपला परंपरागत शेती व्यवसाय सांभाळत असताना सततच्या नापिकीचा सामनाही करावा लागला. परिणामी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शिवसेनेच्या माजी पंचायत समिती सदस्याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
विष्णू तेजराव खवशी (वय ४९, रा. आजनादेवी) असे या शेतकरी तथा माजी पंचायत समिती सदस्याचे नाव आहे. त्यांच्याकडे २५ एकर शेती असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, म्हातारे आई-वडील आहेत. सध्या मुलगी सनदी लेखापालच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. विष्णू खवरी हे सरपंच आणि पंचायत समिती सदस्यही राहिले आहेत. त्यांनी गावाच्या विकासाकरिता विविध योजना राबविल्यात.
दोन वर्षांपूर्वी भारतीय स्टेट बँक, शाखा कारंजाचे त्यांच्याकडे ३२ लाखांचे कर्ज होते. त्यांनी ९ लाख रुपये भरुन तडजोड केली होती. त्यानंतर पुन्हा त्याच बँकेने त्यांना २०२२ मध्ये ५ लाखांचे कर्ज दिले. मुला-मुलीचे शिक्षण, शेतीसाठी खर्च आणि परिवाराचा उदरनिर्वाह यावर होणारा खर्च यामुळे ते सतत आर्थिक विवंचनेत असायचे. त्यांनी बँकेत कर्जाची तडजोड करण्याकरिता ९ लाखांचे कर्ज खासगी सावकाराकडून घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच सततच्या नापिकीमुळे दोन वर्षांपासून शेतामध्ये लागलेला खर्चही भरून निघाला नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. यातून त्यांनी घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या या आकस्मिक निधनाने गावात शोककळा पसरली.
निष्ठावान शिवसैनिक हरपला
कारंजा तालुक्यात एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी गावाच्या, आता आपल्या परिसराच्या विकासासाठी मोलाचे कार्य केले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत असायचे. राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम असो की महावितरण कार्यालयावर बैलबंडी मोर्चा असो, यात ते सहभागी असायचे. विष्णू यांच्या मृत्यूमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. त्यांची जागा कधीही भरुन निघणारी नाही.
- संदीप भिसे, माजी तालुका संघटक, शिवसेना, कारंजा