शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला; तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:52 IST2024-08-27T17:51:54+5:302024-08-27T17:52:49+5:30
नुकसान भरपाईची मागणी : कारंजा तहसीलदारांना दिले निवेदन

Farmers' protest march hits tehsil; Demand for immediate Panchnama and compensation
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सोयाबीन, कपाशीसोबतच आता संत्रा व मोसंबीच्या बागाही धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली. तसेच तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कारंजा तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. आंबिया बहराची ७५ टक्के फळगळ झाली आहे. कीड व बुरशीनाशक औषधींच्या चार ते पाच फवारण्या करूनही गळती कमी होत नाही. अशातच संत्री व मोसंबीची झाडे पिवळी पडून मरत आहेत. २० ते २५ वर्षे मेहनतीने जगविलेली झाडे अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगांमुळे डोळ्यादेखत मरताना पहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अनेक भागातील जमीन ओली असल्याने आंतरमशागत करता येत नाही.
परिणामी तूर, कापूस, सोयाबीन व ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाच्या नियंत्रणावर शेतकऱ्यांना प्रचंड खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. सर्वच शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करणे शक्य होत नाही. तेव्हा शासनानेच पुढाकार घेऊन स्वतः ई- पीक पाहणी करून तातडीने भरपाई द्यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता. या मागणीचे तहसीलदार टिपरे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रदीप शेटे, नितीन भांगे, प्रा. सुभाष अंधारे, केशव भक्ते, मनोज भांगे, युवराज देशमुख, संदीप भिसे, विभाकर ढोले, हरिभाऊ धोटे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.