अपेक्षित भावामुळे तीळ पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:19 IST2025-02-10T17:18:38+5:302025-02-10T17:19:15+5:30
Wardha : तिळाचा काढणीचा हंगाम मे महिण्यात येत असतो. त्यानंतर खरीपाचे शेतकरी पीक घेतो.

Farmers' inclination towards sesame seeds has increased due to expected prices
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शेती परवडत नाही अशी सारखी ओरड आता सर्व स्तरांवर होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात तीळ पेरा नसल्या जमा होता. मात्र, आता काही शेतकरी उन्हाळी तिळाकडे वळल्याने आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी दिसून येत आहे. रब्बीतच त्याची तयारी व नियोजनही करण्यात आल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तिळाची फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात पेरणी करावी लागते. यासाठी जमीन चांगली वखरून भुसभुशीत केल्यास पेरणी आणि उगवण क्षमता चांगली राहते. हेक्टरी चार किलो तीळ आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तिफण, सरते वा ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली जाते. पण बरेचदा तीळ बारीक असल्याने तिफन वा सरत्यांनी पेरताना बारीक वाळू वा राख यांचा सुद्धा उपयोग करतात. खतांची मात्रा सुद्धा दिली जाते. काही शेतकरी शेणखताचा वापरही करतात. पेरणीपूर्वी नंतर बारा-पंधरा दिवसांनंतर पाणी देणे तसेच फुलांवर आल्यावर गरजेनुसार पाणी देणे वाढीसाठी आणि भरण्यासाठी पोषक ठरते. डवरणी निंदाई आंतरमशागत म्हणून केली जाते.
फवारणी केल्यास रोगांवर नियंत्रण मिळणे शक्य
उन्हाळ्यात शेतकरी जास्त पीके घेत नसल्यामुळे तिळावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी आदी प्रकारचे रोग येत असतात. या रोगांचा परिणाम उत्पादनावर पडत असतो. मात्र, यावर वेळीच मार्गदर्शन घेऊन फवारणी केल्या रोगावर नियंत्रण मिळु शकते.
"मी तीन वर्षांपासून तीळ पीक घेत आहे. शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागच्या वेळी दोन एकरात सहा क्विंटल झाले भाव ११ हजार रुपये क्विंटल मिळाला. यावेळी सुद्धा तयारी सुरू आहे."
- रामेश्वर अमनेरकर, हमदापूर