तोतया पोलिसांचा प्रताप; वृद्धाचे ५० हजार लूटले, हिंगणघाट येथील घटनेने खळबळ
By चैतन्य जोशी | Updated: September 15, 2022 15:51 IST2022-09-15T15:47:16+5:302022-09-15T15:51:33+5:30
आरोपी पोलिसांच्या ‘रडार’वर

तोतया पोलिसांचा प्रताप; वृद्धाचे ५० हजार लूटले, हिंगणघाट येथील घटनेने खळबळ
वर्धा : पायदळ जात असलेल्या वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करुन त्याच्याजवळील ५० हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून दुचाकीने पळ काढला. ही घटना कटारिया हॉस्पिटल समोरील चौधरी चौक हिंगणघाट येथे १४ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
बबन माधव जवादे (६५) रा. नारायणपूर ता. समुद्रपूर यांची प्रकृती खराब राहत असल्याने ते हिंगणघाटील रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी आले होते. त्यांच्याजळ ३० हजार रुपयांची रोख रक्कम पहिलेच होती. मात्र, आणखी पैसे काढण्यासाठी ते पोस्ट ऑफीस कार्यालयात गेले आणि तेथून २० हजार रुपयांची रक्कम विड्राॅल केली आणि पोस्टातून ते पायदळ राँका हॉस्पिटल येथे प्रकृती दाखविण्यासाठी जाण्यास निघाले.
ते रस्त्याने पायदळ जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना थांबवून आम्ही पोलीस असल्याची बतावणी केली. दोघांनी हातचलाखीने त्यांच्याजवळील पिशवीत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम घेत दुचाकीने धूम ठोकली. बबन जवादे यांनी पिशवी पाहिली असता त्यांना पैसे दिसून आले नसल्याने त्यांनी थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.