शासकीय नियमाला डावलूण मुरुमाच्या उत्खननाला उधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:50 IST2024-10-24T16:49:34+5:302024-10-24T16:50:51+5:30
सावली वाघ येथील प्रकार : उद्धवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Excavation of sand against government regulations
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : तालुक्यातील मौजा सावली (वाघ) येथील शासकीय जागेवर शासकीय नियमांना डावलून अवैधरीत्या दगड, मुरुमाचे गेल्या काही महिन्यांपासून उत्खनन सुरू आहे. उत्खनन आरक्षित जागा सोडून केले जात असल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास होतो आहे. या प्रकारावर आळा घालावा, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील सावली (वाघ) येथे खनिकर्म विभागाच्या वतीने शासकीय जागेवर गौण खनिज मुरूम व दगड उत्खनन करण्यासाठी काही व्यक्तींनी जवळपास २१ हेक्टर जागेची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या परवानगीची मर्यादा संपली असल्याचेही सांगण्यात आले. असे असताना शासकीय जागेवर पोकलेन, जेसीबी व विस्फोटक वापरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. यामुळे या परिसरात ३० ते ३५ फूट खोल गड्डे तयार झाले आहेत. उत्खननासाठी दिलेल्या आरक्षित जागा सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्यापर्यंत हे उत्खनन सुरू ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यास त्रास होत सहन करावा लागत आहे. विस्फोटक पदार्थामुळे शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना याचा धोका निर्माण झाला आहे.
सुरू असलेल्या प्रकाराची चौकशी करून या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या विस्फोटक पदार्थांऐवजी मजूर लावून उत्खनन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना शेतात काम आहे. त्यांना शेतात जाण्याचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे या विषयाची तातडीने दखल घेऊन स्थळ पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक मनीष देवडे, शंकर मोहम्मारे, शकील अहमद, फिरोज खान, आशिष वाघ, दीपक पावडे, रामाची किनाके, गजानन फरकाडे, राकेश राजूरकर, शकील एकोणकर, दिलीप कुकडे, गजाननराव धोटे, करण जेनेवार, अजय महाकाळकर, अनिल राजूरकर, नीलेश मानकर, योगेश ठग, प्रतीक पावडे, दीपक एकोणकर, संजय एकोणकर, विजय ठग, हनुमान गौळकर, रंजन डोमकावळे, दशरथ तिखट व भास्कर मानकर आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.
शेतात जाणाऱ्या रस्त्याची लागली वाट
शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हे उत्खनन आले आहे. येथे दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे रस्त्याची वाट लागली असून, होणाऱ्या आवाजाचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.