चालकाला लागली डुलकी अन् अनियंत्रित मालवाहू उलटली; १० ते १५ प्रवासी गंभीर जखमी
By चैतन्य जोशी | Updated: August 29, 2022 16:07 IST2022-08-29T16:05:05+5:302022-08-29T16:07:29+5:30
धोंडगाव येथील अपघात, जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु

चालकाला लागली डुलकी अन् अनियंत्रित मालवाहू उलटली; १० ते १५ प्रवासी गंभीर जखमी
गिरड (वर्धा) : मालवाहू चालकाला डुलकी आल्याने अनियंत्रित झालेले वाहन रस्त्याकडेला पलटले. हा अपघात धोंडगाव जवळील मुनेश्वर नगर परिसरात २८ रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास झाला. अपघातात मालवाहू चक्काचूर झाला असून १० ते १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
एम.एच. ३४ बी.जी. ६१९६ क्रमांकाचे मालवाहू वाहनात दहा ते पंधरा प्रवासी वरोरा येथे जात होते. मध्यरात्रीच्या सुमारास चालकाला डुलकी आल्याने स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होत पलट्या खाऊन रस्त्याकडेला जाऊन पलटले. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती शिक्षक सुभाष ननावरे याच्या माहिती होताच त्यांनी पोलिसांना सांगितले.
१०८ क्रमांकावर फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने त्यांनी मित्राच्या खासगी वाहनाने व पोलीस विभागाच्या वाहनाने समुद्रपूर रुग्णालाता जखमींना घेऊन गेले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनिल दहिभाते, राहुल मानकर यांनी अपघातस्थळ गाठून पंचनामा केला.
धोंडगाव वासियांची तत्परता
मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास गावातील तरुणांनी वेळ वाया न घालवता जखमींना स्वत:च्या वाहनाने व पोलीस वाहनाने समुद्रपूर येथे हलविले. मात्र, पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने गावातील लोकांनी त्यांना मदत दिली.
ग्रामीण आरोग्याचा उडाला बोजवारा
जखमींना पुढील प्रवासासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. मात्र, दोन तास होऊनही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. अखेर नागरिकांनी पैसे गोळा करुन जखमींची मदत केली.