लग्नाला न आल्याने चुलत मामेभावावर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 18:00 IST2024-05-02T17:56:55+5:302024-05-02T18:00:26+5:30
दत्तपूर बायपासवर थरार : आरोपीस बेड्या, तीन राऊंड केले फायर

Cousin shot for not coming to the wedding
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : साखरेचे पडलेले पोते गाडीवर ठेवून बांधण्यासाठी दुचाकीवर बसवून घेऊन गेलेल्या चुलत मामेभावाला निर्जनस्थळी नेत पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्या, एक गोळी व्यक्तीच्या मांडीत लागून बाहेर निघाली तर दुसरी हुकली. तिसरी गोळी फायर करताच बंदुकीत अडकली. हा थरार शहरातील दत्तपूर चौकातून गेलेल्या बायपास परिसरात सोमवार, २९ रोजी मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस रेहकी गावातून रात्रीतूनच अटक केली.
हर्षल लंकेश्वर झाडे (३१, रा. नालवाडी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सध्या सेवाग्राम येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव राहुल वाघमारे (रा. रेहकी) असे आहे. जखमी हर्षल झाडे याचा आरोपी राहुल वाघमारे हा चुलत मामेभाऊ आहे. हर्षल व त्याची पत्नी स्नेहल हे दोघेही भारतीय डाक विभागात काम करतात. फेब्रुवारी महिन्यात आरोपी राहुलचे लग्न झाले होते. त्या लग्नाला हर्षल गेला नव्हता. त्याचा राग राहुलच्या मनात होता, असे बयाण आरोपीने दिले. २९ एप्रिल रोजी हर्षल घरी असताना आरोपी राहुल त्याच्या घरी गेला आणि दत्तपूर बायपासजवळील टी पॉइंट परिसरात माझ्या दुचाकीवरून साखरेच्या गोण्या पडल्या आहेत. त्या गोण्या उचलून माझ्या गाडीवर बांधून दे, असे म्हणत दुचाकीवर बसवून बायपास रस्त्यालगत एका निर्जनस्थळी नेले. तेथे शाब्दिक वाद करून मारहाण केली. तसेच जवळील पिस्तूल काढून त्यातील गोळ्या झाडल्या, सुमारे तीन राऊंड आरोपी राहुलने फायर केले. त्यापैकी एक गोळी हर्षलच्या मांडीतून आरपार गेली, दुसरी हुकली आणि तिसरी फायर करताच बंदुकीतच अडकली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार सचिन इंगोले यांनी मोठ्या शिताफीने आरोपी राहुल वाघमारे याचा शोध घेऊन त्यास रेहकी गावातून अवघ्या काही तासात अटक केली, घटनास्थळी पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी भेट देत पाहणी केली, सेवाग्राम ठाण्याचे एपीआय विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांकडूनपुढील तपास सुरु आहे.
हर्षलच्या प्रगतीवर होता आरोपी राहुलचा रोष
■ हर्षल व त्याची पत्नी डाक विभागात कार्यरत आहे, तसेच त्याचा एक भाऊ दिल्ली येथे असल्याने आरोपी राहुल वाघमारे याचा हर्षलच्या प्रगतीवर रोष होता. तसेच यातूनच त्याच्यात द्वेषभावना निर्माण झाली आणि त्याने हर्षलचा गेम' करण्याचे ठरविले. यातूनच ही घटना घडल्याची माहिती आता पुढे येत आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
...अन् 'तो' हर्षलवर गोळ्या झाडतच राहिला
■ हर्षलवर पहिली गोळी झाडताच ती गोळी त्याच्या मांडीतून आरपार बाहेर निघाली. जखमी स्थितीत हर्षलने दत्तपूर चौकाकडे धाव घेतली. दरम्यान, आरोपी राहुल याने लगेच त्याच्यावर दुसरी गोळी झाडली, ती हुकल्याने पुन्हा तिसरी गोळी झाडली. मात्र, ती बंदुकीतून बाहेरच आली नाही. तोपर्यंत जखमीने त्याच्या पत्नीला फोन करून माहिती दिली. पत्नीने लगेच धाव घेत जखमीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले.
पिस्तूल जप्त, २ मेपर्यंत पोलिस कोठडी...
आरोपी राहुल वाघमारे याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याच्याकडे एकूण दहा काडतुसे होती. त्यापैकी तीन काडतुसे हर्षलवर झाडली, सेवाग्राम पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी राहुलला २ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेशित केले आहे. कोठडीदरम्यान तो काय बयाण देतो. याकडे आता लक्ष लागले आहे. या घटनेने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली.