कापूस लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सीसीआय ग्रेडरची दांडी; शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:11 IST2024-12-13T18:09:33+5:302024-12-13T18:11:16+5:30
Wardha : कापसाची आवकही कमी, भावबाजीतही फटका

CCI grader's stake in cotton auction process; Discontent among farmers
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : देवळीच्या कापूस लिलाव प्रक्रियेत सीसीआय ग्रेडरचा सहभाग राहत नसल्याने याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोप होत आहे. गुरुवारच्या तारखेपर्यंत देवळीच्या बाजारात ४६ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यामध्ये सीसीआयची खरेदी नाममात्र ९ हजार क्विंटलपर्यंत झाली आहे.
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असून भावबाजीचा सुद्धा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत आला आहे. अशावेळी सीसीआयची खरेदी पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने, कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहण्यात येत आहे. देवळी केंद्रावर सीसीआयचे अधिकृत ग्रेडर म्हणून चंद्रकांत हिवसे कार्यरत असून त्यांचेकडे वर्धा, वायगाव, आमला, उमरी व शिरपूर आदी ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे सर्व केंद्रावर ऐकाच वेळी काम करणे शक्य नसल्याने हिवसे यांच्या अनुपस्थितीत कर्मचारी ग्रेडिंग करीत आहे. परंतु या ग्रेडींगदरम्यान अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये हुज्जत होतांना दिसत आहे. देवळीच्या बाजार समितीत रजिस्ट्रेशन केल्यानंतर सीसीआयच्या कापूस खरेदीची तसेच ग्रेडिंगची प्रक्रिया स्थानिक नरसाई जिनिंगमध्ये राबविली जात आहे. सोबतच कापसाचा ओलावा तपासून प्रतिक्विंटल ७ हजार ५२१ पर्यंत भाव दिला जात आहे. सीसीआयच्या तुलनेत आठ दिवसापूर्वी खासगी व्यापाऱ्यांचे भाव सुद्धा प्रतिक्विंटल ७ हजार ३०० ते ७ हजार ४०० पर्यंत होते. परंतु सध्या हे भाव ७ हजार १०० ते ७ हजार २०० पर्यंत खाली आले आहे. सीसीआयचे अधिकारी लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने खासगी व्यापारी याचा फायदा घेत आहे. त्यामुळे कापसाच्या भावबाजीत तेजी राहण्यासाठी, खुल्या लिलावात सीसीआयचे असणे आवश्यक झाले आहे.
कापसाची उलंगवाडीकडे वाटचाल
या हंगामात कापसाचे उत्पादन अतिशय कमी असून, परिसरातील कापसाची शेती उलंगवाडीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कपाशीवर लाल्या रोग आल्याने दोन वेच्यातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच यवतमाळ, राळेगाव व आजूबाजूच्या परिसरात सीसीआयचा विस्तार वाढल्याने देवळीच्या केंद्रावर बाहेरून येणारी कापसाची आवक घटली आहे. त्यामुळे या केंद्रावरील दरवर्षीचा साडेपाच ते सहा लाख क्विंटल पर्यंतच्या खरेदीचा आकडा खाली येणार असल्याचे बोलले जात आहे
सीसीआयकडून आठ दिवसाच्या फरकाचा मिळतो धनादेश...
सीसीआयच्या वतीने आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठ दिवसाच्या फरकाने कापसाचे चुकारे वळते केले जात आहे. तर खासगी व्यापारी तीन दिवसांच्या फरकाने कापसाचे धनादेश देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून सीसीआयच्या आसपासच भाव मिळत आहे व चुकारेही सीसीआयपेक्षा लवकर मिळत असल्याने शेतकरीही आपले हित जोपासत असल्याचे दिसून येत आहे.