सावधान, 'ती'चा फोटो आला तर मोह टाळा; कराल 'क्लिक' तर होईल घोटाळा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 18:32 IST2025-04-30T18:29:08+5:302025-04-30T18:32:36+5:30
सायबर चोरट्यांनी शोधला आता नवा फंडा : मोबाइलवर लिंक पाठवून केले जाते खाते रिकामे

Be careful, if you see a photo of 'her', avoid temptation; if you 'click', you will be scammed!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे नवनवे फंडे समोर येत असून, अशाच प्रकारे आणखी एक नवा फंडा समोर आला आहे. पूर्वी मोबाइलवर लिंक पाठवून बँक खाते रिकामे केले जात होते; परंतु आता लिंकऐवजी एखाद्या सुंदर तरुणीचा फोटो मोबाइलवर पाठवून तुमचे बैंक खाते रिकामे केले जात आहे. यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.
मोबाइलची क्रांती झाल्यापासून घरबसल्या लाखो रुपये लोकांच्या खात्यातून क्षणात गायब होऊ लागले आहेत. नागरिकांच्या अज्ञानाचा, तसेच बेसावधपणाचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे नवनवे फंडे आत्मसात करत आहेत. पूर्वी तुमचे एटीएम बंद पडले आहे, तुमच्या बँक खात्याची केवायसी करायची आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगून ओटीपी घेतला जात होता. कालांतराने हा फसवणुकीचा फंडा मागे पडला. यानंतर मोबाइलवर एखादी लिंक पाठवून संबंधिताने लिंक ओपन केल्यानंतर क्षणात संबंधिताचे बँकेचे अकाउंट रिकामे होत होते. अशा फसव्या लिंक ओपन केल्यानंतर आपले पैसे गायब होतात. हे नागरिकांच्या लक्षात येऊ लागल्यानंतर सायबर चोरट्यांनी 'डिजिटल अरेस्ट'चा नवा फंडा समोर आणला आहे. याकडेही लक्ष द्यावे.
फोटो आल्यास काय पहिले काय कराल?
अनोळखी व्यक्तीच्या मोबालइवरून अशा प्रकारचा फोटो आल्यास तो फोटो डाउनलोड न करता तातडीने डिलिट करा. कोणालाही फॉरवर्ड करू नका.
चॅटिंग तसेच व्हिडीओ कॉलिंग करू नका. अशा अनोळखी व्यक्तीला मुळात प्रतिसाद देऊ नका.
रात्री अकरानंतरच पाठवतात फोटो...
मोबाइलधारकांच्या मोबाइलवर विशेषतः रात्री अकरानंतर सायबर चोरटे सुंदर तरुणीचा फोटो पाठवत आहेत. हा फोटो पुरुष नक्कीच ओपन करून पाहणार, अशी मानसिकताही सायबर चोरट्यांनी ओळखली आहे. त्यामुळे ही रात्रीची वेळ चोरट्यांनी फोटो पाठविण्यासाठी निवडली आहे, असे पोलिस सांगताहेत.
तीन कोटी रुपयांवर केली भामट्यांनी फसवणूक...
जानेवारी २०२४ ते मार्च २०२५ या १५ महिन्यांच्या कालावधीत ऑनलाइन फसवणुकीचे ८० गुन्हे दाखल झालेत. यात जवळपास ३ कोटी रुपयांवर ऑनलाइन रक्कम लंपास करण्यात आली. यापैकी २७ प्रकरणे उजेडात आणून ३० आरोपींना अटक करण्यात यश आले. तसेच लाखो रुपयांची रक्कम पीडितांना परत केली आहे तर काही रक्कम होल्ड करण्यात यश आले आहे.
सेक्सटॉर्शन'च्या तक्रारी वाढल्या
सायबर भामट्यांकडून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सेक्सटॉर्शनमध्ये अडकविण्याचा प्रकार सुरू आहे. यात उच्चशिक्षितच मोठ्या प्रमाणत अडकत आहेत. सायबरकडे अशा तक्रारीही वाढल्या आहेत. मात्र, गुन्हा दाखल करण्यास कुणी धजावत नसल्याचे दिसून आले आहे.
प्रत्येकाच्या मोबाइलवर 'कॉलर ट्यून'
प्रत्येकाच्या मोबाइलवर डिजिटल अरेस्टसंदर्भात कॉलर ट्यूनच्या माध्यमातून राज्य सरकारने जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे काहीअंशी का होईना, डिजिटल अरेस्टचे गुन्हे आटोक्यात येऊ लागले आहेत. असे असताना आता सायबर चोरट्यांनी मोबाइलधारकांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्या मोबाइलवर एखाद्या सुंदर तरुणीचा फोटो पाठविण्यास सुरुवात केली आहे. हा फोटो संबंधिताने उत्सुकतेपोटी डाउनलोड केल्यास काही क्षणातच संबंधितांचे बँक खाते रिकामे होत आहे. हा नवा फंडा सुरू केला आहे.
१५ महिन्यांत कोटी रुपयांची फसवणूक केली
सायबर फसवणुकीचे तब्बल ८१ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यात नागरिकांच्या खात्यातून कोटी रुपयांची रक्कम भामट्यांनी लंपास केली आहे.