वर्धा जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के वाहनांच्या नंबरप्लेट जुन्याच !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:21 IST2025-08-12T19:20:21+5:302025-08-12T19:21:53+5:30
'एचएसआरपी'चा घोळ संपेना : १५ ऑगस्टनंतर जुन्या प्लेटधारकांना होणार दंड

As many as 70 percent of the vehicle number plates in Wardha district are old!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनधारकांना हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. एप्रिल २०२५ अखेरची मुदत राज्य शासनाने चार महिन्यांनी वाढवून दिल्यानंतरही वाहनधारकांनी अद्याप नंबरप्लेट बसवून घेतलेल्या नाहीत.
दोन लाख ४९ हजार ९६८ वाहनधारकांपैकी ८७ हजार ६२३ जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४४ हजार १३४ जणांनीच नंबरप्लेट बसवून घेतल्या तर ४२ हजार ८१० प्रक्रियेत असून, अद्यापही १ लाख ६२ हजार ३४५ जण जुन्याच प्लेट लावून रस्त्याने धावत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वच वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यात व देशात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनधारकांना नवी नंबरप्लेट लावून घ्यावी लागणार आहे. तर एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना वितरकांकडूनच एचएसआरपी नंबरप्लेट बसवून दिली (इनबिल्ड) जात आहे.
नंबरप्लेट बदलाचा इतिहास
नव्वदच्या दशकापूर्वी (वर्ष १९९०) विहित नमुन्यात काळ्या प्लेटवर पांढरे अक्षरे व अंक लिहून नंबरप्लेट तयार केली जात होती. त्यानंतर दहा वर्षांनी (वर्ष १९९९ ते २०००) नंबरप्लेट पांढरी झाली. अंक, अक्षरे काळी करण्याचा निर्णय झाला. लगेच रंगाने लिखित नंबरप्लेट जाऊन याच कालखंडात रेडियम स्टीकरने नंबरप्लेट लिहिण्याचे बंधन घालण्यात आले. येथूनच चित्रविचित्र नंबरप्लेटचा ट्रेंड वाढत गेला. आता १ एप्रिल २०१९ पासून एचएसआरपी नंबरप्लेटचा नियम अस्तित्वात आलाय.
अन्यथा वाहनांवर दंड
केवळ अधिकृत एचएसआरपी उत्पादकांनी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत मोटार वाहनांसाठी बसवलेली एचएसआरपी वैध मानली जाईल व त्यांची वाहने पोर्टलवर अद्ययावत केली जातील. इतर कोणत्याही साम्य असलेल्या एचएसआरपी उत्पादक, पुरवठादारांकडून एचएसआरपी बसवल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन कायदा व नियमांच्या तरतुदीनुसार एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
जिल्ह्यात अडीच लाख वाहने
जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची संख्याच अडीच लाखांवर आहे. अद्याप जनजागृतीअभावी वाहनधारकांमध्ये नंबरप्लेट बसवण्याबाबत अनभिज्ञता दिसून येतेय. शिक्षित वाहनधारक प्लेटा बसवताय.
१५ ऑगस्ट शेवटची मुदत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, एचएसआरपी नंबरप्लेटसाठी पूर्वी ३० एप्रिल ही मुदत होती. मात्र, राज्यातील वाहनांची संख्या, नंबरप्लेट लावून देणारी अधिकृत केंद्र व नोंदणी करणारे ग्राहक पाहता, चार महिन्यांची मुदत वाढवून दिली होती. ही मुदत संपली असून, १५ ऑगस्ट शेवटची तारीख असल्याचे जाहीर केले आहे.
येथे करा नोंदणी
उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी बसवण्यासाठी www.transport. maharashtra.gov .in या संकेतस्थळावर एचएसआरपी बुकिंग जाऊन संबंधित पोर्टल लिंकला भेट द्या.
"एचएसआरपी नंबरप्लेट ही वाहनधारकांसाठी फायद्याचीच आहे. मुदतवाढ दिल्यानंतरही बहुतांश वाहनधारकांनी प्लेट बदललेल्या नाहीत. १५ ऑगस्टनंतर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभाग कारवाईला व दंड आकारणीला सुरुवात करेल."
- स्नेहा मेंढे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.