वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:51 IST2025-01-15T16:50:54+5:302025-01-15T16:51:39+5:30
Wardha : कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी

Are minor girls safe in Wardha district?
वर्धा : एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात असताना लहान मुली विकृतांच्या वासनेच्या बळी पडत आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे सर्व गुन्हे जलदगती न्यायालयात चालवून कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी वारंवार होत आहे. शहरातदेखील वारंवार विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा चालक, परिचयातील व्यक्तींकडून गैरप्रकार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ
शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, विनयभंगासह अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. २०२४ मध्ये ५४ गुन्ह्यांची नोंद झाली. याव्यतिरिक्त अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीचे ५० वर गुन्हे दाखल झाले.
९५ टक्के गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास पूर्ण
अल्पवयीनांसोबत झालेल्या गैरप्रकाराच्या गुन्ह्यांमध्ये जवळपास ९५ टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन आरोपींना अटक झाली आहे. अशा गुन्ह्यांत महिला अधिकारी व बाल कल्याण समितीच्या सदस्यांसमोर जबाब नोंदवून प्रक्रिया पार पाडावी लागते.
७० टक्के परिचितच
अल्पवयीन मुली, मुलांसोबत होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये ७० टक्के आरोपी हे परिचयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही पालकांचीच आहे.
सोशल मीडिया ठरतेय कारणीभूत...
महिला व मुलींवर अत्याचार होण्यात बऱ्याच प्रमाणात सोशल मीडिया जबाबदार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा व मुलगी जवळ येतात. याची भनक पालकांना लागत नाही. अल्पवयीन मुलींना फारशी समज राहत नसल्याने त्या मुलांकडून टाकण्यात आलेल्या बनावट प्रेमाच्या पाशात अडकतात. त्यानंतर प्रेमाच्या आड शारीरिक शोषण केले जाते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना आठ दिवसांतून एकदा घडते. काही पालक तर पोलिसात तक्रार देण्यासही जात नसल्याचे दिसून आले आहे. यातून या प्रकारांना आणखीच बळ मिळत असल्याचे दिसते.