Afcons ordered to pay Rs 90 crore | अ‍ॅफकॉन्सला २३९ कोटी रूपये भरण्याचा आदेश

अ‍ॅफकॉन्सला २३९ कोटी रूपये भरण्याचा आदेश

वर्धा : जिल्ह्यात विनापरवानगी बेकायदेशीरपणे ३ लाख २ हजार ५२८.१२ ब्रास मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी सेलूच्या तहसीलदारांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे कंत्राट घेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला २३८ कोटी ९९ लाख ७२ हजार १४८ रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम ३० जानेवारीपर्यंत शासन खजिन्यात भरून त्याची चालान प्रत सादर करण्याचेही निर्देशही देण्यात आले आहेत.

२३८ कोटी ९९ लाख ७२ हजार १४८ रुपयाच्या रकमेसंदर्भात या कंपनीवर आधीच नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, आदेशाच्या कारवाईत दिरंगाई होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी हा आदेश जारी केला.
अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीन खोदून लाखो ब्रास गौणखनिजाची चोरी केली आहे. सेलू तालुक्यातील केळझर व खापरी (ढोणे) या शिवारातही लाखो ब्रास मुुरूम चोरल्याप्रकरणी कोझी प्रॉपर्टीजने सेलू पोलिसांसह तहसील कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे महसूल विभागाने चौकशी सुरू केली. उत्खनन केल्यासंदर्भात नायब तहसीलदारांनी अहवाल सादर केला असता त्यामध्ये मोक्यावर अंदाजे २५ ते ३० एकरामध्ये गौणखनिजाचे उत्खनन केल्याचे पंचनाम्यात नमूद केले. त्या पंचनाम्यावरून तहसीलदारांनी अ‍ॅफकॉन्सला नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. खुलासा प्राप्त झाल्यानंतर जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्यावतीने नियुक्त केलेल्या पथकाने इटीएसद्वारे केलेल्या मोजणीनुसार ३ लाख २ हजार ५२८.१२ ब्रास गौणखनिजाचे अवैधरीत्या उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे.

अ‍ॅफकॉन्सने नेमले १९ उपकंत्राटदार
अ‍ॅफकॉन्स कंपनीने सादर केलेल्या खुलाशामध्ये महामार्गाच्या कामाकरिता १९ उपकंत्राटदार नेमल्याचे स्पष्ट केले आहे. यातील एम.पी. कन्स्ट्रक्शन हा एक उपकंत्राटदार असून त्याने विनापरवानगी गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक केल्याची कबुली दिली आहे.
या कंपनीला समृद्धी महामार्ग बांधण्याकरिता अंदाजपत्रकानुसार १.९० कोटी क्युबिक मीटर मुरुमाची गरज आहे. त्यापैकी १.०५ कोटी क्युबिक मीटर मुरूम त्यांना कटिंगमधून मिळणार आहे तर ०.८५ कोटी क्युबिक मीटर मुरुमाची उचल ते परवानगीप्राप्त क्षेत्रामधून करणार असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Afcons ordered to pay Rs 90 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.