एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत बळजबरी उचलून नेले
By चैतन्य जोशी | Updated: August 29, 2022 18:07 IST2022-08-29T17:47:55+5:302022-08-29T18:07:15+5:30
आरोपी अटकेत, रामनगर पोलिसांची कारवाई

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत बळजबरी उचलून नेले
वर्धा : तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे, असे म्हणत चक्क आई अन् वडिलांसमोरच युवकाने अल्पवयीन मुलीस तिच्याच घरातून पळवून नेत पोबारा केला. मात्र, रामनगर पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध घेत अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली.
ही कारवाई शांतीनगर परिसरात २८ रोजी रामनगर पोलिसांकडून करण्यात आली. शांतीनगर परिसरातील रहिवासी अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह घरी हजर असताना आरोपी अंकुश अमरसिंग जाखर (२२) रा. शांतीनगर याने अनाधिकृतपणे मुलीच्या घरात प्रवेश केला. मुलीच्या आई वडिलांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने न जुमनाता थेट मुलीच्या आई वडिलांना माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तुम्ही मला तुमची मुलगी देत नाही, असे म्हणत त्यांच्या समोरच मुलीचा हात पकडून बळजबरीने मुलीला दुचाकीवर बसवून घेऊन गेला.
मुलीच्या आई वडिलांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी अंकुशने धक्काबुक्की केली. अखेर मुलीच्या वडिलांनी याबाबतची तक्रार रामनगर पोलिसात दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपी अंकुश जाखर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलीस पथक रवाना केले. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी अंकुश जाखर याला बेड्या ठोकून कोठडीत पाठविले.