झोपलेल्या व्यक्तीच्या पांघरुणात फोडला सुतळी बॉम्ब, कान तुटून पडला; वर्ध्यातील संतापजनक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 15:07 IST2022-10-31T14:56:20+5:302022-10-31T15:07:42+5:30
परिसरात उलटसुलट चर्चेला उधान; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

झोपलेल्या व्यक्तीच्या पांघरुणात फोडला सुतळी बॉम्ब, कान तुटून पडला; वर्ध्यातील संतापजनक घटना
वर्धा : घरात झोपून असलेल्या व्यक्तीच्या पांघरुणात अज्ञाताने सुतळी बॉम्ब फोडल्याने व्यक्तीचा कान तुटून जमिनीवर पडला. ही घटना स्टेशनफैल परिसरात घडली. याप्रकरणी २९ रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. युसूफ खान पठाण (५६) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. सध्या युसूफवर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
युसूफ हा २९ रोजी दुपारच्या सुमारास त्याच्या घरी झोपला होता. घराचे दार उघडे होते. दरम्यान अज्ञाताने त्यांच्या पांघरुणात सुतळी बॉम्ब फोडला. यामुळे घरात ब्लास्ट झाल्यासारखा मोठा आवाज आला. परिसरातील नागरिकांनी युसूफच्या घराकडे धाव घेतली असता युसूफ रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडून होता. त्याचा उजवा कान अर्धवट तुटून खाली पडलेला होता. नागरिकांनी त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
ही बाब नागरिकांनी युसूफचा मुलगा ऐफाज याला सांगितली. ऐेफाज याने वर्धा गाठून थेट घरात जात पाहणी केली असता युसूफच्या पांघरुणाच्या बाजूला सुतळी बॉम्बचे तुकडे आणि बारुद पडलेली दिसून आली. त्याने याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.