जिल्ह्यातील ४३६ शाळा संरक्षक भिंतीविना ! शाळेत भौतिक सुविधांचाही अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:33 IST2025-03-03T18:30:12+5:302025-03-03T18:33:10+5:30

टप्प्याटप्प्यात होणार काम : ४२ शाळांत कामाला मंजुरी, वर्षभरात होणार पूर्ण

436 schools in the district without protective walls! There is also lack of facilities in the school | जिल्ह्यातील ४३६ शाळा संरक्षक भिंतीविना ! शाळेत भौतिक सुविधांचाही अभाव

436 schools in the district without protective walls! There is also lack of facilities in the school

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची जडणघडण व शैक्षणिक विकास जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत असतो. मात्र, बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या भौतिक सुविधांचा अभाव आहे. जिल्ह्यातील तब्चल ४३६ शाळांना अद्यापही संरक्षक भिंती नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.


शिक्षण विभागाच्या धोरणानुसार भौतिक सुविधांचे १० घटक आहेत. सदर १० घटकांनुसार प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. बहुतांश शाळांमध्ये या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्धा जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्याच्या आठ तालुक्यांत शाळांची संख्या शेकडोच्या घरात आहे. या शाळेतून शिक्षण घेत मोठ्चा हुद्द्यावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बदलत्या स्थितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकताहेत हे खरे असले तरी, त्यांची गती मात्र कमी असल्याचे दिसून येते.


डीपीडीसीच्या निधीतून होणार संरक्षक भिंती
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांना संरक्षक भिंती बांधकामासाठी शाळेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. याची संख्या ४३६ एवढी होती. मात्र शासनाकडून संरक्षक भिंतीसाठी निथी मिळाला नसल्याने ही कामे डीपीडीसीच्या निधीतून करण्यात येणार आहेत. टप्प्याटप्यात ही कामे होणार असून यंदा ४२ कामे केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.


ठराविक निधीतून कामे
शाळांच्या संरक्षक भिंतीसाठी डीपीडीसीकडून निधी देण्यात आला आहे. मात्र हा निधी तोकडा पडत असल्याने यात जिल्ह्यात संरक्षक भिंतीसाठी प्रस्ताव पाठविणाऱ्या शाळांपैकी १०० मीटर पर्यंत कामे असणाऱ्या शाळांना प्राधान्य दिले गेले आहे. त्यापेक्षा अधिक कामे लांबी असलेल्या शाळांना प्रतीक्षा यादीत ठेवले असून निधी प्राप्त होताच त्या शाळेतील कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंजुरी मिळालेल्या शाळेतील संरक्षण भिंतीसाठी बांधकाम विभागाकडे कामे देण्यात आली आहे. वर्षभरात कामे पूर्ण केली जाणार आहे.


५ वर्षात २३४ शाळांच्या सरंक्षक भिंतीची झाली कामे
जिल्ह्यातील शाळांना संरक्षक भिंतीची कामे पूर्ण करण्यासाठी सन २०१९-२० पासून सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत २३४ शाळांच्या भिंतीची कामे करण्यात आली आहेत.


वर्षनिहाय केलेली कामे
२०१९-२० : १५३
२०२०-२१ : ०४
२०२१-२२ : ७७
२०२४-२५ : ४३


"शाळेतील सुरक्षा भिंतीची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव ठेवला होता. प्रस्तावित शाळांपैकी ४२ शाळांच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही कामे पूर्ण केली जाणार आहेत."
- डॉ. नितू गावंडे, शिक्षणाधिकारी, वर्धा
 

Web Title: 436 schools in the district without protective walls! There is also lack of facilities in the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.