२८ हजार खातेधारकांनी घेतले पोस्टाच्या विम्याचे कवच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 18:16 IST2024-07-27T18:15:29+5:302024-07-27T18:16:35+5:30
७५५ रुपयांत मेडिक्लेमची सुविधा : १५ लाखाचे विमा, प्रसूतीसाठी रुग्णालयाचा दिवसाकाठी मिळणार दोन हजारांचा खर्च

28 thousand account holders have taken post insurance cover
चेतन बेले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आरोग्य आणि अपघाताच्या घटना सांगून घडत नाहीत, अशा स्थितीला तोंड देण्यासाठी विमा पॉलिसी काढली जाते. त्यात मेडिक्लेमची सुविधा हवी असल्यास प्रीमीयमच्या नावे मोठी रक्कम भरावी लागते. मात्र, पोस्टाची ७५५ रुपयांची विमा योजना सर्वसामान्यांना मेडिक्लेम सुविधेसह १५ लाखांचे विमा कवच देते. यात प्रसूतीसाठी दोन हजार रुपये प्रतिदिवस दवाखान्याचा खर्च देय अल्याने जिल्ह्यात २८ हजार खातेधारकांनी पोस्टाचे विमा कवच घेतले आहे.
पोस्टाने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी हेल्थ प्लस आणि एक्स्प्रेस हेल्थ योजना सुरू केली आहे. यात मात्र ७५७ रुपयांत १५ लाखांच्या विम्याचे कवच देण्यात आले आहे. यात अपघाती मृत्यु, स्थायी अपंगत्व, स्थायी अंशतः अपगंत्वासाठी १०० टक्के दावे निकाली काढले जाते. शिवाय मुलांच्या लग्नासाठी एक लाख रुपये, क्षतिपूर्ती तत्त्वावर अस्थिभंगासाठी २५ हजार, भाजल्याच्या जखमांसाठी १० हजार, कोमात गेलेल्या रुग्णांसाठी दर आठवड्याला अपघाती कव्हरच्या ৭ टक्के दराने १० आठवड्यांपर्यंत वजावट दिली जाते.
अपघात झाल्यास वैद्यकीय भरपाई एक लाख रुपयांपर्यंत ओपीडीशिवाय दिली जाते. अंत्यसंस्कारासाठी ७ हजार रुपये, मृत्युपश्चात मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च देण्यात येते. वर्षातून एकदाच ही रक्कम भरायची असल्याने ३६५ दिवस विमा कव्हर मिळणार आहे, त्यानंतर दरवर्षी रिन्युअल करणे गरजेचे आहे. ही योजना केवळ पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतमजूर, कामगार वर्गाना होणार फायदा
जिल्ह्यात शेतमजूर, शेतकरी, तसेच कामा- गारवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. महागडे प्रीमीयम असलेली विमा पॉलिसी घेणे शक्य नसल्याने अनेकांनी विमाच उतरविला नसल्याचे वास्तव आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी पोस्टाची ही विमा पॉलिसी लाभदायी ठरणार आहे. या योजनेत १८ ते ६५ वर्षांतील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकतो.
प्रसूती कुठेही करा, खर्च देणार पोस्ट बँक
महिलांची प्रसूती म्हटले की, अनेकजण खासगी रुग्णालयाला प्राधान्य देतात, विषय भावनिक असल्याने खर्च अंगभर होतो. अशा स्थितीत पोस्टाची ७५५ रुपयांची पॉलिसी साधारण १ हजार रुपये प्रतिदिवस तर आयसीयूसाठी २ हजार रुपये प्रतिदिवस बेडचा खर्च दिला जातो. रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला १५ दिवसांपर्यंत लाभ दिला जातो. विषेश म्हणजे नोकरवर्ग यांना इएसआयसीचा लाभ मिळतो. त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येत असल्याचे पोस्ट विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
७४ लाखांचे क्लेम दिले
पॉलिसीधारक ग्राहकांनी केलेल्या क्लेमचे ५४ लाख रुपयांचे अपघाती विमा दावे निकाली काढले आहे. तर अपघाती मृत्यूची तीन प्रकरणे निकाली काढली असून, ३० लाख रुपये खातेधारकांच्या नातेवाइकांना देण्यात आले आहेत. यातील एक प्रकरण निकाली निघण्याच्या प्रक्रियेत आहे.
१.७६ लाख ग्राहक
जिल्ह्यात १९९ पोस्ट ऑफिस आहे. यात १ हेड ऑफिस, २६ उपडाकघर, १७२ शाखा डाकघर आहे. प्रत्येक शाखेत पोस्ट पेमेंट बँकेची सुविधा असून याचे तब्बल १ लाख ७६ हजार ग्राहक आहेत. मात्र, अद्याप केवळ २८ हजार खाते धारकांनीच ही पॉलिसी काडल्याचे वास्तव आहे.
या कारणांसाठी लाभ देय
वीज कोसळून मृत्यू, करंट लागून मृत्यू, सर्पदेश, प्राणी चावा, अपघात, पाय घसरून पडल्याने मृत्यू, कामादरम्यान अपघात आदी कारणांसाठी विमा देय आहे.
"गत वर्षभरात ७४ लाख रुपयांचे दावे निकाले काढले आहे. ही योजना शेतमजूर, नोकरवर्गासाठी फायदेशीर आहे. महिलांना या योजनेतून विम्वाचे कवच देता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न सुरू आहे. लवकरच बचत गटाच्या महिला, गावोगावी शिबिर लावून या योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविली जाण्याचे नियोजन केले आहे."
-पी. ए. गेडाम, डाक अधीक्षक, हेड पोस्ट ऑफिसवर्धा.