जिल्ह्यातील १८ आरोग्य उपकेंद्रांचा होणार कायापालट; ११ कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 18:48 IST2025-03-24T17:23:57+5:302025-03-24T18:48:19+5:30
Wardha : ११ कोटींचा निधी इमारत बांधकामासाठी मंजूर केल्याची माहिती

18 health sub-centers in the district will be transformed; Rs 11 crore approved
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण भागात रुग्णांची वाढती संख्या व त्या तुलनेत सुविधांची कमी, अपुरा परिसर, यामुळे अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्नित उपकेंद्रांचा कायापालट होणार आहे जिल्ह्यातील १८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी ११ कोटी १ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात येतात. या सुविधांसाठी मंडल केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अधिनस्थ उपआरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात २८ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्याअंतर्गत १८१ आरोग्य उपकेंद्र आहेत. या केंद्रांमधून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा दिल्या जातात. उपकेंद्रांची जागा अपुरी असण्यासोबतच सुविधा कमी असल्याची नेहमी तक्रार होती. त्यामुळेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतीत सुविधांमध्ये वाढ होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
या आरोग्य उपकेंद्रांची होणार नवीन इमारत
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या सेलू तालुक्यातील पळसगाव (बाई), आकोली, बोरी (कोकाटे), केळझर, देवळी तालुक्यातील मुरदगाव (खोसे), इंझाळा, अंदोरी, नांदोरा (डफरे), हिवरा (गुंजखेडा), आष्टी तालुक्यातील खड़की, माणिकवाडा, कारंजा तालुक्यातील चांदेवाणी, काकडा, माळेगाव (ठेका), गारपीट, हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव, समुद्रपूर तालुक्यातील पेठ, वर्धा तालुक्यातील करंजी (भोगे) येथील आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींसाठी प्रत्येक केंद्रनिहाय ५८.२७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच वर्धा येथे नवीन बीपीएचयू इमारत बांधकामासाठी ५२.५ लाख रुपयांचा निधी, असा एकूण ११ कोटी १ लाख ४५ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांना प्रशासकीय मान्यतादेखील देण्यात आली आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुदृढ होणार असल्याने रुग्णांनाही चांगल्या सुविधा मिळणार.
आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सदोदीत प्रयत्न असणार
"ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा मोठा आधार असतो. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यापूर्वी ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक असणारे निर्जंतुकीकरण जंतुनाशक उपकरणे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता १८ उपकेंद्रासाठी व वर्धा येथे नवीन बीपीएचयू इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे."
- डॉ. पंकज भोयर, पालकमंत्री.