वर्धा येथे ३० खाटा आयुष रुग्णालयासाठी १०.५० कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:18 IST2025-02-16T17:17:00+5:302025-02-16T17:18:02+5:30
Wardha : ३० खांटांची रुग्णालयात असणार सुसज्ज व्यवस्था

10.50 crores sanctioned for 30-bed AYUSH hospital in Wardha
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष कार्यक्रमांतर्गत वर्धा येथे ३० खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी १३.७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे रुग्णालयाच्या बांधकामासाठी १० कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आयुर्वेद उपचाराची पद्धती ही फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन काळात आयुर्वेद पद्धतीने उपचार करण्यात येत होते. ही पद्धती जुनी असली तरी प्रचलीत आहे.
रुग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग झाला आता सुकर
या जागेवर रुग्णालय बांधण्यासाठी संपूर्ण आराखड्यासह प्रस्ताव जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालकाकडे सादर केला आहे. आयुष रुग्णालयाच्या बांधकामासाठी १३.७८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे; मात्र या प्रस्तावास मान्यता देण्यात न आल्याने रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले नव्हते. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या रुग्णालयासाठी तातडीने निधी देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे १९ जुलै रोजी केली होती. तसेच आयुष रुग्णालयासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले.
रुग्णालयाच्या निर्मीती संदर्भात वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय आयुष अभियानाचे डॉ. अविनाश भागवत यांनी यासंदर्भात पत्र काढले. रुग्णालयासाठी १० कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तथापि, निधी मंजूर झाल्यामुळे रुग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. आयुर्वेदाचे महत्त्व व फायदे लक्षात घेऊन सध्या या पद्धतीने उपचार घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रत्येक जिल्ह्यात आयुष रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्धा येथे राष्ट्रीय आयुष कार्यक्रमांतर्गत ३० खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर करण्यात आले. यासाठी जि.प. ने शहरालगतच्या म्हसाळा ग्रा.पं. क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक २९ मधील जागा उपलब्ध करून दिली आहे.
विकास कामांचा धडाका
शेतकऱ्यानंतर आता आरोग्य विषयक सुविधांची पायाभरणी करण्याकरीता पालकमंत्री डॉ. भोयर यांनी विशेष प्रयत्न चालविले आहे. यातूनच त्यांनी आयुष ग्णालयासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. या रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुदृढ होणार असल्याचे भविष्यात दिसून येणार आहे.
"रुग्णालय वर्धेत व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यासाठी म्हसाळा येथे जागा उपलब्ध करण्यात आली; मात्र निधीअभावी अडचण होती; पण आता निधीची तरतूद झाल्याने लवकरच रुग्णालयाच्या निर्मितीचे काम सुरू होईल."
- डॉ. पंकज भोयर, पालकमंत्री, वर्धा