आजोबांच्या तेरवीला नातीने ठेवला देह; कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 17:02 IST2022-10-15T17:02:03+5:302022-10-15T17:02:42+5:30
घटनेने गाव हळहळले

आजोबांच्या तेरवीला नातीने ठेवला देह; कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर
देवळी (वर्धा) : राहते घरी आजोबाच्या तेरवीसाठी टाकलेल्या मंडपात निकटवर्तीयांसह नातेवाइकांची वर्दळ सुरू असतानाच नातीने देह ठेवल्याची घटना नजीकच्या बोपापूर (दिघी) येथे घडली.
बोपापूर (दिघी) येथील जि. प. प्राथमिक शाळेत वर्ग चौथीचे शिक्षण घेणारी जीविका प्रकाश विहिरे (वय १०) हिला बुधवारी थंडी लागून ताप आला. सकाळी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने ही बाब वडिलांना सांगितली. त्यामुळे देवळीच्या ग्रामीण रुग्णालयात नेऊन तिच्यावर औषधोपचार करण्यात आले; परंतु हा ताप अजून वाढत गेल्याने तसेच अधून-मधून उलट्या येत असल्याने तिला गुरुवारी सकाळी वर्धेच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अशातच शुक्रवारी सकाळी जीविकाची प्राणज्योत मालविली. आजोबांच्या तेरवीच्या दिवशीच ही घटना घडल्याने विहिरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. एक दिवासाआधी अचानक आलेल्या तापाने शाळकरी मुलीचा घात केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.