his parents and father will not give vote 'this' candidate to Maharashtra, lok sabha election osmanabad | गावकरी सोडाच, महाराष्ट्रातील 'या' उमेदवाराला त्याचे आई-वडीलही देणार नाहीत मत, कारण...

गावकरी सोडाच, महाराष्ट्रातील 'या' उमेदवाराला त्याचे आई-वडीलही देणार नाहीत मत, कारण...

उस्मानाबाद - लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात असलेल्या असुविधांबद्दल उमेदवार आणि स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी दर्शवत अख्ख गावचं मतदानावर बहिष्कार टाकत आहे. विशेष म्हणजे या गावातील तरुण मुलगा आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड हे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार असून त्यांनाही मतदानावर बहिष्कार टाकण्याची विनंती गावकऱ्यांनी केली आहे.   

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात  येत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. तर, शिवसेनेकडून माजी आमदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाला लोकसभा निवडणुकांसाठी उस्मानाबाद या मतदारसंघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील हक्काचा उमेदवार म्हणून तालुक्यातील वाणेवाडी गावचे पुत्र शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रस्थापितांविरुद्ध लढण्यासाठी शेतकरी नेता असलेल्या शंकर गायकवाड यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता उमेदवारी कायम ठेवली. मात्र, येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शंकर गायकवाड यांना गावातील एकही मत मिळणार नाही. विशेष म्हणजे शंकर यांच्या आई-वडिलांचेही मतदान शंकर यांना पडणार नाही. कारण, या गावातील सर्वच गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील समस्या सोडविण्यात स्थानिक नेते अपयशी ठरल्याचे सांगत गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 

उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे. या गावातील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय एकमताने घेतला असून सर्वच गावकरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साधारणत: 1200 ते 1300 लोकसंख्या आणि 800 मतदान असलेल्या या गावात अनेक स्थानिक नेत्यांनी संपर्क केला. मात्र, अद्याप गावकरी मानायला तयार नाहीत. ग्रामस्थांनी चक्क गावाच्या बाहेर एक डीजिटल फलक झळकावला आहे. त्यामध्ये वाणेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार असे लिहिले आहे. तसेच, गावकऱ्यांकडून पत्रेकही छापण्यात आली आहेत. त्या पत्रकारवरही ''अभी नही तो कभी नही'' असा संदेश लिहून गावातील  समस्यांची यादीच देण्यात आली आहे. 

गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची वैशिष्टे 
गावात येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही.
पाण्याची कसलिही सोय नाही.
देश स्वतंत्र झाल्यापासून बससेवा नाही.
जिल्हा परिषद शाळा पडझडीस आली आहे, तर शाळेकडे कुठल्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसते. 
अनेक गोर-गरीब ग्रामस्थांना रेशनकार्ड नाही. 
शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. 
सरकारी अधिकाऱ्यांचे गावाकडं दुर्लक्ष
असे मुद्दे गावकऱ्यांनी छापलेल्या पत्रकात लिहिलेली आहेत.

उमेदवार शंकर गायकवाड 

उस्मानाबद लोकसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये प्रमुख लढत ही महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेचे नेते राणा जगजितसिंह तर  शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात होत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार उभा केला आहे. तर, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, चळवळीतून उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकरी नेता म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. शंकर गायकवाड यांनी अनेक आंदोलनातून शेतकरी वर्गाला न्याय मिळवून दिला आहे. तर, स्थानिक प्रश्नांसाठी आंदोलन करुन जनतेचे प्रश्नही अनेकदा मार्गी लावले आहेत. मात्र, अद्यापही गावातील प्रश्न अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे यंदा गावकऱ्यांनी जी भूमिका घेतली त्यास आपलाही पाठिंबा असल्याचे शंकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.   

गावकऱ्यांच्या भूमिकेला माझाही पाठिंबा आहे, पण मी उमेदवार असल्याने मतदान करणे बंधनकारक आहे. मी मतदान न केल्यास कायदेशीर भंग होईल, असे तहसिलदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. मात्र, माझ्या कुटुंबातील सदस्य, माझे आई-वडिल आणि बायकोचेही मला मतदान मिळणार नसल्याचे शंकर यांनी म्हटले. तसेच, मला मिळणाऱ्या मतदानापेक्षा माझ्या गावकरांचे प्रश्न सुटणे गरजेचं असल्याचंही शंकर गायकवाड यांनी सांगितलं. 
 

Web Title: his parents and father will not give vote 'this' candidate to Maharashtra, lok sabha election osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.