Dhangar reservation movement started in Tuljapur | मशाल पेटवून फुंकले आरक्षण आंदोलनाचे रणशिंग

मशाल पेटवून फुंकले आरक्षण आंदोलनाचे रणशिंग

तुळजापूर  : धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, पण अजूनही केंद्र व राज्य सरकारने त्याची पूर्तता केलेली नाही़. यामुळे समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप करत समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी व त्यासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतुद ताबडतोब करण्यात यावी, या मागण्यांसाठी सोमवारी मल्हार आर्मी समस्त धनगर समाजाने तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर मशाल पेटवून आंदोलनाचे रणशिंग फुंकले़

स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी धनगर समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट झालेला नाही. त्यामुळेच श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वारासमोर देवीच्या चरणी मशाल पेटवून समाज बांधवांनी आंदोलनास सुरूवात केली. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही मशाल तेवत ठेवली जाईल. तसेच ही ज्योत महाराष्ट्रभर फिरवून आरक्षणासाठीची जनजागृती केली जाणार असून संपूर्ण महाराष्ट्रभर आरक्षणासाठी सरकार विरोधात आंदोलन केली जाणार असल्याचे मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब बंडगर यांनी सांगितले़

यावेळी सचिव गणपत देवकते, प्रदेशाध्यक्ष काकासाहेब मारकड, जिल्हासंपर्क प्रमुख आण्णासाहेब बंडगर, जिल्हाध्यक्ष निलकंठ कोपणवार, समर्थ पैलवान, प्रमोद दाणे, प्रशांत गवडे, वैभव लकडे, आदित्य पैलवान, शहाजी हाके, अर्जुन झाडे, चैतन्य बंडगर, रवी बंडगर, समाधान पडवळकर व समाजबांधवांची उपस्थिती होती.

या मागण्यांसाठी आंदोलन

आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी, मेंढपाळावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील जाचक निकष बदलण्यात यावे, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यात यावे, स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना सारथी संस्थेप्रमाणे स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात यावी, बेरोजगार युवक युवतींना मोफत पोलीस तसेच लष्कर भरतीसाठी प्रशिक्षण देण्यात यावे.

Web Title: Dhangar reservation movement started in Tuljapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.