तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:02 IST2026-01-01T14:02:19+5:302026-01-01T14:02:39+5:30
...म्हणूनच हा स्तंभ तुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.

तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे गेले कुठे..?
पालिका निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या विषयांची चर्चा व्हावी असे नागरिकांना वाटते. लोकांचे हे प्रश्न कसे सोडवले जाणार? याची उत्तरे नागरिकांना हवी असतात. मात्र धर्म, भाषा, जात यापलीकडे निवडणुका जायला तयार नाही. आरे ला कारे म्हणणे, ठोकाठोकीची भाषा करणे, टोकाला जाऊन राजकारण करणे याच गोष्टी निवडणुकीत जाणीवपूर्वक आणल्या जातात. कारण सामान्य जनतेच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर उमेदवारांना आणि पक्षांना बोलायचेच नसते, असा समज दृढ होत चालला आहे. म्हणूनच हा स्तंभ तुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.
स्वच्छतागृह : स्लॅबमधून गळती, रस्त्यावरच थेट सांडपाणी
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था अजूनही कायम आहे. शांतीनगर येथील रस्त्यावरच असलेले स्वच्छतागृह हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. स्वच्छतागृहाभोवती सांडपाणी आणि कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. स्वच्छतागृहात ठिकठिकाणी गळती लागली असून, काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे, असे रहिवाशांनी सांगितले. स्लॅबमधून पाण्याची गळती होत असून, ते पाणी थेट रस्त्यावर साचते. त्यामुळे डासांचे साम्राज्य पसरले आहे. पालिका कर्मचारी येतात, पण ते व्यवस्थित साफ करत नसल्याने दुर्गंधी पसरते. नागरिकांना येथून जाताना नाकावर रूमाल धरून जावे लागते. लोकप्रतिनिधी येतात आणि बघून जातात. पण, त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. दुरूस्ती कधी होणार, हा रहिवाशांचा प्रश्न आहे.
सांगा : कल्याणचा हा रस्ता कधी ओलांडता येणार?
कल्याण, पश्चिमेतील स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता ओलांडणे म्हणजे जीवघेण्या अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. या चौकापासून हाकेच्या अंतरावर केडीएमसीचे मुख्यालय आहे. या चौकातून सतत वाहनांची ये-जा सुरू असते. चौकातील एक रस्ता रेल्वेस्थानक, एसटी डेपोसह कल्याण न्यायालय, तहसील कार्यालय, सहायक पोलिस आयुक्त कार्यालय, पंचायत समिती, रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे येताे. चारही बाजूने वाहने येत असल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांचा गोंधळ उडतो. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. मात्र याठिकाणी सिग्नल यंत्रणाच नाही. या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र शहरातील एकाही लोकप्रतिनिधीला ही समस्या दिसत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
धोका : भिवंडीत प्रदूषण वाढले; मोकळा श्वास घ्यायचा कसा?
यंत्रमाग उद्योग असलेल्या भिवंडी शहरात कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग साइजिंग कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. या कंपनीतून निघणाऱ्या धुराने भिवंडीकरांचा जीव नकोसा झाला आहे. एकीकडे महापालिका यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने प्रदूषणाकडे पालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. या कंपन्या दिवसाढवळ्या विषारी केमिकल वायू हवेत सोडूनही यंत्रणेच्या नजरेस कसे पडत नाही, हे मोठे आश्चर्य आहे. प्रदूषण एवढे वाढले आहे की, अनेक नागरिकांच्या घरांमध्ये काजळी आली आहे. आम्ही गुदमरून मरावे, अशी तर यंत्रणांची इच्छा नाही ना? असा प्रश्न भिवंडीकरांनी पक्ष व संभाव्य उमेदवारांना विचारला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत प्रदूषणाच्या प्रश्नावरही बोला अशी अपेक्षा आहे.
बोला : डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा डोंगर हटणार कधी ?
उल्हासनगर शहरातील खडी खदान येथे इतका कचरा साचला आहे की, डोंगर उभा राहिला आहे. या कचऱ्याला सतत आग लागत असल्याने २० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाकातोंडात धूर जाऊन श्वसनाचे विकार जडले आहेत. हे डम्पिंग ग्राउंड हटविण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले, नागरिक रस्त्यावर उतरले, पण डम्पिंग काही हटले नाही. सरकारने उसाटणे येथे जागा दिली, लाखो रुपये खर्चून कुंपण घातले, तेथील नागरिकांनी डम्पिंगला विरोध केल्याने समस्या जैसे थे आहे. डोंगर असाच वाढणार की कधीतरी स्वच्छ दिसणार असा प्रश्न विचारला आहे.