ठाण्यात १३ रुपयांत वडापाव अन् ३० रुपयांत उसळवडा कुठे मिळतो? ते स्टॉल दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:56 IST2025-12-26T09:56:13+5:302025-12-26T09:56:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यात वडापाव खायचा तर २० रुपये मोजावे लागत असताना जिल्हा निवडणूक विभागाने त्याकरिता १३ ...

ठाण्यात १३ रुपयांत वडापाव अन् ३० रुपयांत उसळवडा कुठे मिळतो? ते स्टॉल दाखवा!
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात वडापाव खायचा तर २० रुपये मोजावे लागत असताना जिल्हा निवडणूक विभागाने त्याकरिता १३ रुपयांचा दर निश्चित केला, पाण्याची बाटली २० रुपयांना मिळत असताना ती १२ रुपयांत कशी द्यायची आणि ७० ते ८० रुपयांना मिळणारा उसळवडा ३० रुपयांत कसा द्यायचा खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा असा पेच उमेदवारांपुढे उभा ठाकला आहे. निवडणूक विभागाने प्रचार खर्चाचे प्रारूप दर निश्चित केले.
खाद्यपदार्थांचे दर
वडापाव, वडा उसळ ते कटिंग चहा, कॉफी पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहे.
प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा
घालून दिली आहे. पालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारास १३ लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे
उमेदवार किती खर्च करतो हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक केली आहे. .
राजकीय पक्षांपुढे पेच
निवडणूक विभागाने निवडणुकीसाठी टाचणीपासून जेवणापर्यंतचे निश्चित केलेले दर आणि बाजारातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे खर्च करायचा कसा हा पेच राजकीय
पक्षांपुढे उभे ठाकला आहे.
कटिंग चहा सहा रुपयांत कसा पाजायचा?
कटिंग चहा दहा रुपयांचा असताना त्यासाठी सहा रुपये दर आहे. समोसा एक नग १५, पावभाजी ९० रुपयांपासून पुढे असताना त्यासाठी ७० रुपये, साबुदाणा वडा ८० रुपये असतांना त्यासाठी ४०, साबुदाणा खिचडी ३५, आम्लेट सँडविच ३६, व्हेज सँडविच प्लेन ३०, चीज ग्रिल्ड सँडविच १००, पोहे २५, शिरा २५, उपमा २४ रुपये असे दर निश्चित केले आहेत.
भिवंडीत उमेदवारांना खर्चाची ९ लाखांची मर्यादा
भिवंडी : निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ९ लाखांपर्यंत केली आहे. प्रचारासाठी रॅलीसह, सभा, बॅनर, नाष्ट्यापासून ते स्टेशनरीपर्यंत सुमारे ५०२ साहित्यांची यादी प्रसिद्ध केली. निवडणूक विभागाने दिलेल्या खर्चांत वडापाव खर्च १३ रुपये, वडा उसळ ३० रुपये, समोसा १५ रुपये, इडली सांबार ३०, मेदू वडा, चटणी ४० रुपये, नारळ पाणी ४० रुपयांपर्यंत सूचना आहेत.