'मतदान हा लोकशाहीचा कणा; ठाण्यात मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग', एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
By अजित मांडके | Updated: January 15, 2026 13:50 IST2026-01-15T13:48:32+5:302026-01-15T13:50:45+5:30
राज्यातील २९ महापालिकांसह ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरू असून, ठाण्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

'मतदान हा लोकशाहीचा कणा; ठाण्यात मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग', एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
- अजित मांडके
ठाणे - राज्यातील २९ महापालिकांसह ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरू असून, ठाण्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिंदे म्हणाले, “सगळीकडे सकारात्मक वातावरण असून नागरिक उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. लोकशाही व्यवस्थेत मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदानाचा आपला हक्क कुणीही हिरावून घेऊ नये. प्रत्येक मताचे मोल खूप मोठे असून शहराच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी ते निर्णायक ठरते,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
राज ठाकरे यांनी मांडलेल्या मतदानावरील शाईच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. “ही शाई अनेक वर्षांपासून वापरली जात असून बोगस मतदान होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या प्रश्नावर बोलताना शिंदे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी यंत्रे बंद पडली असतील, त्याची तात्काळ नोंद घेतली जाते. “निवडणूक आयोग याबाबत सतर्क असून मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते,” असे त्यांनी नमूद केले.
बोगस मतदानाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, सर्व पक्षांचे कार्यकर्ते मतदान केंद्रांबाहेर उपस्थित असतात. त्यामुळे गैरप्रकार होऊ नयेत याची दक्षता घेतली जाते. “बोगस मतदान होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने लक्ष ठेवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजप नेते गणेश नाईक यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता हात जोडून प्रश्न टाळला.