उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
By सदानंद नाईक | Updated: December 23, 2025 21:16 IST2025-12-23T21:15:38+5:302025-12-23T21:16:12+5:30
निवडणुकीच्या तिकिटांवरून वाद होण्याची चिन्हे

उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
सदानंद नाईक, उल्हासनगर: आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरमधील शिंदेसेनेत अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. "वर्षानुवर्षे नगरसेवक पद उपभोगणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करा आणि तरुणांना संधी द्या, अशी उघड मागणी युवासेनेचे शहराध्यक्ष सुशील पवार यांनी केली आहे.
ज्येष्ठांनी 'मार्गदर्शक' व्हावे. जे नेते गेल्या २५-३० वर्षांपासून नगरसेवक आहेत, त्यांनी आता निवडणूक न लढवता तरुणांना मार्गदर्शन करावे. एकाच घरात दोन-दोन तिकिटे देण्याची पद्धत बंद करावी. घराणेशाहीमुळे निष्ठावान आणि कष्टाळू तरुणांना संधी मिळत नाही, असा आरोप पवारांनी केला आहे. "आम्ही केवळ सतरंज्या उचलण्याचेच काम करायचे का?" असा संतप्त सवाल युवा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
युवासेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील प्रस्थापित नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पक्षात आता ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा संघर्ष उभा राहिल्याने निवडणुकीच्या तिकिटांवरून वाद होण्याची चिन्हे आहेत.
नेत्यांची प्रतिक्रिया:
या वादावर बोलताना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, युवासेना पदाधिकाऱ्यांची नेमकी नाराजी काय आहे, हे आम्ही समजून घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू.