२ कोटी ७५ लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त; ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:20 IST2026-01-04T09:20:58+5:302026-01-04T09:20:58+5:30
शस्त्र, मद्य व अमलीपदार्थ आदींचा समावेश

२ कोटी ७५ लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त; ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १५ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या १७ दिवसांच्या कालावधीत पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागासह अन्य यंत्रणांनी शहरातील विविध ठिकाणी व्यापक आणि कठोर कारवाई केल्याची माहिती आचारसंहिता पथक अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली.
या कालावधीत बेकायदा मद्य, अमलीपदार्थ, रसायने, शस्त्रास्त्रे, प्रचार साहित्य आणि रोख रक्कम असा दोन कोटी ७५ लाख नऊ हजार ९६५ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आचारसंहिता पथकांतर्गत नेमलेली स्थिर तपास पथके, फ्लाइंग स्क्वॉड आणि लेखा पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. मॉडेला चेक नाका, श्रीनगर, किसननगर, खारीगाव, मनीषानगर, खारीगाव या ठिकाणी रोज विविध पथकांमार्फत तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत ९.५४ लाख इतकी रोख रक्कम जप्त केली आहे.
अमलीपदार्थ व शस्त्रांवर विशेष मोहिमेत ५७,९३७.१७६ किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. याची किंमत दोन कोटी २८ लाख ४८ हजार ७५७ इतकी आहे, ५९ अवैध शस्त्रास्त्रे जप्त करून ६१९ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. त्याचबरोबर लोखंडी चाकू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
मद्य वाटपाविरोधात विशेष मोहीम
महापालिका निवडणूक योग्य वातावरणात पार पडावी यासाठी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकत्रित कारवाईत दहा लाख २७ हजार ६३ रुपयांचा दहा हजार लिटर मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ६८ गुन्हे दाखल करून ५३ आरोपींना अटक केली. तर एक लाख १४ हजार ६३३ रुपयांची एक हजार १४६ लिटर गावठी दारू, ३५ हजार ७७० रुपयांचे ८९ लिटर देशी मद्य, बिअर- ७०.५५ लिटर, २० हजार ७४० रुपयांचे विदेशी मद्य/वाइन, ५५ हजार २५० लिटरचे रसायन असा २६ लाख ८१ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी सांगितले.