निष्क्रिय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा कोलमडली; निवडणुकीबाबत मिळत नाही माहिती; राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:36 IST2026-01-03T12:35:27+5:302026-01-03T12:36:37+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत एकाही दिवशी या निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती वरिष्ठांना किंवा माध्यमांना दिली नाही.

निष्क्रिय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा कोलमडली; निवडणुकीबाबत मिळत नाही माहिती; राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी
ठाणे/ कल्याण : ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमध्ये नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी हे निष्क्रिय व बेजबाबदार आणि ढिसाळ कारभार करणारे असल्याच्या तक्रारी थेट राज्य निवडणूक आयुक्तांपर्यंत करण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत एकाही दिवशी या निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती वरिष्ठांना किंवा माध्यमांना दिली नाही.
ठाण्यात मुख्य निवडणूक अधिकारी अर्थात आयुक्त आहेत. त्यांच्या हाताखाली एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त, ११ निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या हाताखाली तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. एवढी मोठी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असूनही निवडणूक निर्णय अधिकारी हे सक्षमपणे काम करू शकलेले नाही.
‘आरओ’ झाले रिचेबल
मुंबई : निवडणूक प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यापासून अर्ज माघारीपर्यंत सर्वांत महत्त्वाची भूमिका असलेले ‘आरओ’ अर्थात निवडणूक निर्णय अधिकारी सुरुवातीला संपर्क क्षेत्राच्या बाहेर
होते, मात्र आता हे अधिकारी रिचेबल झाले आहेत.
कल्याण डोंबिवलीत नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नेमले. त्यांच्याकडून महापालिका मुख्यालयातील निवडणूक कार्यालयास वेळेत माहिती दिली जात नसल्याने उमेदवारी अर्ज किती भरले, किती अर्ज छाननीत बाद झाले ही माहिती मिळत नव्हती.
अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली नाही
निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये महेश पाटील, अर्चना खेतमाळीस, राजू थोटे, वरुणकुमार सहारे, अश्विनकुमार पोतदार, आशा तामखेडे, प्रशांत जोशी, संजय पाटील, जर्नादन कासार यांचा समावेश आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन भूमकर यांच्याकडे तक्रार केल्यास त्यांच्याकडून सांगण्यात येते की, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती आली नाही. त्यामुळे काय करणार? जनसंपर्क विभागाचे अधिकारी संजय जाधव व माधवी फोफळे यांच्याकडेही वेळेवर माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यांनीदेखील हतबलता दाखविली.
मिरा-भाईंदरमधील लेटलतीफ कामावर टीका -
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठीची गेले दोन-तीन दिवसांतील कामकाज प्रक्रिया पाहता निवडणूक निर्णय अधिकारी व पालिकेच्या ढिसाळ तसेच लेटलतीफ कामावर टीका होत आहे.
७ निवडणूक कार्यालये थाटली आहेत. शिवाय कामकाजासाठी अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रसामग्री दिलेली आहेत. मात्र, आरओ कार्यालयाकडून आलेले अर्ज, छाननी, वैध व अवैध यादी, अंतिम यादी आदी कामांत वेळकाढूपणा होत आहे. त्यामुळे संताप आहे.
उमेदवारांचे अर्ज लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड होतील’, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी दिली.