नववर्षात अर्ज माघारीनंतरच लढतींचे चित्र होणार स्पष्ट ! बंडखोरी, पक्षांतर टाळण्यासाठी अळीमिळी गुपचिळी : इच्छुकांची घालमेल सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:09 IST2025-12-27T10:09:19+5:302025-12-27T10:09:51+5:30
भाजप-शिंदेसेनेच्या युतीच्या वाटाघाटींच्या चर्चा पहाटेपर्यंत सुरू असून, महाविकास आघाडीचे नेते सुद्धा रात्र जागवत आहेत.

नववर्षात अर्ज माघारीनंतरच लढतींचे चित्र होणार स्पष्ट ! बंडखोरी, पक्षांतर टाळण्यासाठी अळीमिळी गुपचिळी : इच्छुकांची घालमेल सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे / डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या महापालिका निवडणुकीत युती किंवा आघाडी होणार का, कुणाच्या वाट्याला कुठली जागा जाणार, कुणाला उमेदवारी मिळणार या व अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आणखी सात दिवसानंतर म्हणजे २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच मिळतील, असे संकेत आहेत. कुठलाही पक्ष किंवा युती-आघाडी आपले पत्ते २ जानेवारीपूर्वी उघड करणार नाही. कारण, सर्वच पक्षांना बंडखोरीची आणि गळतीची भीती वाटत आहे. काही पक्षांनी तर रात्रीच्यावेळी ए-बी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. मात्र, सर्वच पक्षांचे इच्छुक प्रचंड अस्वस्थ आहेत.
भाजप-शिंदेसेनेच्या युतीच्या वाटाघाटींच्या चर्चा पहाटेपर्यंत सुरू असून, महाविकास आघाडीचे नेते सुद्धा रात्र जागवत आहेत. काही तिढा असलेल्या जागांवर या बैठकांत चर्चा सुरू असली, तरी बहुतांश विद्यमान जागांबाबत आणि वर्षानुवर्षे लढवत असलेल्या जागांवरील सर्वच पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. भाजप-शिंदेसेनेत सध्या अन्य पक्षांतून नेते, पदाधिकारी येत आहेत. त्यामुळे हे पक्ष कुणाला उमेदवारी देणार हे जर उघड झाले, तर अगदी या सत्ताधारी पक्षांमधून सुद्धा इच्छुक उद्धवसेना, मनसे, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अथवा काँग्रेसमध्ये उडी मारण्याची भीती आहे. भाजप-शिंदेसेनेची युती होणार हे जवळपास नक्की आहे. युती झाल्यावर कुठली जागा कुणाला हे जाहीर झाले तरीही भाजपला वॉर्ड दिल्यावर शिंदेसेनेतील इच्छुक दुसऱ्या पक्षात उडी मारतील किंवा बंडाचा झेंडा फडकवतील, अशी भीती आहे.
हे पक्ष आधीच फुटीने ग्रासलेले
उद्धवसेना, मनसे, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस या पक्षांना अगोदरच फुटीने ग्रासलेले आहेत. यातील काही पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यावर आणखी गळती सुरू होईल. त्यामुळे ३० डिसेंबर या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत केवळ युती किंवा आघाडी झाल्याची घोषणा पक्ष करतील.
मात्र, किती जागा कुठल्या पक्षाला दिल्या, कुठल्या जागा दिल्या व तेथे उमेदवार कोण हे २ जानेवारी रोजी उमेदवारीची माघार घेईपर्यंत जाहीर करणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कुठल्या वॉर्डात कुणी अर्ज दाखल केलाय ते समजेल.
मात्र, पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण व बंडखोर कोण याचा सस्पेन्स २ जानेवारी रोजी उमेदवारी माघारीनंतरच संपेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
नेमलेली समिती कागदावरच
कल्याण-डोंबिवलीमध्ये युती व्हावी यासाठी भाजप, शिंदेसेनेने समिती नेमली, मात्र ही समिती कागदावरच असून, मुख्य चर्चा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांत सुरू आहे.
समितीचे पदाधिकारी दोन वेळा एकत्र आले गप्पा मारल्या आणि घरी गेले. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल, असे समितीचे सदस्य सांगत आहेत.
भाजपला ८३ जागा हव्या असून, पाच वर्षे महापौर पद द्यावे, असा प्रस्ताव आम्ही शिंदेसेनेसमोर ठेवला आहे, त्यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित आहे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.
शिंदेसेनेचे ७० आणि भाजपचे ५३ ते ५७ नगरसेवक असे मिळून युती करण्याचा प्रस्ताव आम्ही भाजपला दोन्ही बैठकीत दिला, आता दोन्ही पक्षांचे नेते जे ठरवतील ते बघू, असे आ. राजेश मोरे यांनी सांगितले.
रात्रीच्या अंधारात हाती पडले एबी फॉर्म
रात्रीच्या अंधारात अनेकांच्या हाती एबी फॉर्म पडले असून, जेव्हा सांगितले जाईल, तेव्हाच उमेदवारी अर्ज भरा असे सांगितल्याची माहिती आहे. प्रत्येक पक्षातील बहुतांश उमेदवार निश्चित झाले असून, काही इच्छुक नेत्यांच्या घरांच्या, कार्यालयांच्या चपला झिजवत आहेत. त्यावर तू प्रचाराला सुरुवात कर. काळजी करू नको, असे सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा सल्ला दिला जात आहे.
प्रचाराची दिशा स्पष्ट होईल
जो निर्णय घ्यायचा तो घेतला म्हणजे प्रचाराची दिशा स्पष्ट होईल आणि त्यानुसार काम करता येईल असे इच्छुकांचे म्हणणे आहे. जर पुढे जाऊन एकमेकांसमवेत रहायचे असेल तर आरोप प्रत्यारोप करून संबंध का बिघडवायचे असा प्रश्न दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी लोकमतशी बोलताना केला.
जर युती नसेल होणार तर वेळीच सांगितले गेले तर त्यानुसार प्रभागांत जाऊन आपापले मुद्दे मांडता येतील असेही त्यांचे म्हणणे आहे. युती, उमेदवारी जाहीर होण्याचे ठरत नसल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये काहीशी घालमेल सुरू असल्याचे दिसून येत आहे.