'लोकशाहीची अंतिम घटका मोजली जात आहे'; जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप
By अजित मांडके | Updated: January 15, 2026 14:19 IST2026-01-15T14:16:40+5:302026-01-15T14:19:20+5:30
ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मतदान केंद्रांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असून, यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.

'लोकशाहीची अंतिम घटका मोजली जात आहे'; जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप
- अजित मांडके
ठाणे - ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मतदान केंद्रांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असून, यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
आव्हाड म्हणाले, “महाराष्ट्रात लोकशाहीची अंतिम घटका मोजायला सुरुवात झाली आहे. संविधानानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बॅनर, प्रचार साहित्य असू नये. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रांच्या आतच बॅनर लावले जात आहेत. पत्रकारांना ‘आम्ही परवानगी दिली आहे’ असे सांगितले जात आहे. वृषाली पाटील नावाच्या अधिकाऱ्यांनी जर आतमध्ये बॅनर लावण्यास परवानगी दिली असेल, तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे,” असा आरोप त्यांनी केला.
प्रशासकीय यंत्रणेवर मोठा दबाव असल्याचा दावा करत आव्हाड यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. “जर अशीच स्थिती असेल, तर पुढच्या निवडणुका सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात. आयोगाला निवडणूक घेण्याची गरजच राहणार नाही, तसेच खर्चही वाचेल,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
ईव्हीएम यंत्रांबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, “निवडणूक आयोगाची मस्करी सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही व्यवस्थेचे वाटोळे होत आहे,” असा आरोप त्यांनी केला. मतदानाच्या टक्केवारीवर भाष्य करताना आव्हाड म्हणाले की, “अशी परिस्थिती राहिली, तर मतदानाची टक्केवारी वाढणार नाही. लोक मतदानालाच येणार नाहीत. दादागिरी, पैशांचे खुले वाटप, अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकणे आणि पोलिसांवरचा दबाव हे सर्व सामान्य नागरिकांना मान्य नाही,” असे ते म्हणाले. भाजप नेते गणेश नाईक यांच्या मतदार यादीतील नावाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आव्हाड यांनी, “हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारा,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, संबंधित निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्यावर पुन्हा टीका करत आव्हाड म्हणाले की, “या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत मी याआधीही तक्रार केली होती. त्या मनमानी पद्धतीने निर्णय घेतात. निवडणूक आयोगालाच या प्रक्रियेची फारशी पर्वा नाही,” असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, “निकालाबाबत मला फारशी आशा नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.