उमेदवारी अर्ज भरण्यापासून पक्षाने रोखल्याने मुहूर्त हुकला, ठाण्यात इच्छुकाची वेगळीच पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:59 IST2025-12-30T13:55:21+5:302025-12-30T13:59:24+5:30
Thane Municipal Corporation Election: ठाण्यातील युतीच्या काही मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारचा मुहूर्त काढला होता. परंतु, युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम न झाल्याने ऐनवेळी पक्षाने त्यांना शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरणे थांबवण्याचा आदेश दिला.

उमेदवारी अर्ज भरण्यापासून पक्षाने रोखल्याने मुहूर्त हुकला, ठाण्यात इच्छुकाची वेगळीच पंचाईत
ठाणे - ठाण्यातील युतीच्या काही मातब्बर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारचा मुहूर्त काढला होता. परंतु, युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम न झाल्याने ऐनवेळी पक्षाने त्यांना शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरणे थांबवण्याचा आदेश दिला. या उमेदवारांनी अर्ज भरण्याकरिता गर्दी जमवली होती. मात्र, त्यांचा हिरमोड झाला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असून, काहींना एबी फॉर्म उपलब्ध झाले आहेत.
९ वाजून ३० मिनिटांनी शिंदेसेनेच्या उमेदवाराची अर्ज भरण्याची वेळ होती.
कार्यकर्त्यांची जमवाजमव
अनेकांनी सोमवारचा मुहूर्त साधत अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. पाचपाखाडीत भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनीही ढोलताशा वाजवत अर्ज भरण्याची तयारी केली होती. बाजूला असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन अर्ज भरण्याची तयारी केली होती. त्यांनादेखील थांबण्याच्या सूचना आल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना माघारी जाण्याच्या सूचना केल्या.
पक्षाकडून थांबण्याची सूचना आली. तसेच एबी फॉर्मही उपलब्ध झाला नाही, महायुतीची बोलणी सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यावर मंगळवारी अर्ज भरणार आहे.
- संजय भोईर, माजी नगरसेवक, शिंदेसेना
युतीची बोलणी सुरू आहे, तसेच पॅनलमध्ये कोण उमेदवार असणार याचे चित्र स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे एकत्रितच अर्ज भरण्याचे नियोजन करण्यात आल्याने अर्ज भरला नाही.
- नारायण पवार, माजी नगरसेवक, भाजप