ठाण्यात सहा उमेदवारांची बिनविरोध निवड; मतपत्रिकेत नावे नसल्याने विरोधकांचा आक्षेप
By अजित मांडके | Updated: January 15, 2026 13:26 IST2026-01-15T13:25:52+5:302026-01-15T13:26:30+5:30
Thane Municipal Corporation Election: ठाणे महापालिका निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून, त्यांच्या नावांचा मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिकेत समावेश करण्यात आलेला नाही.

ठाण्यात सहा उमेदवारांची बिनविरोध निवड; मतपत्रिकेत नावे नसल्याने विरोधकांचा आक्षेप
- अजित मांडके
ठाणे - ठाणे महापालिका निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून, त्यांच्या नावांचा मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिकेत समावेश करण्यात आलेला नाही. या निर्णयावर विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असली, तरी निवडणूक यंत्रणेने नियमांनुसारच कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांमधून पॅनल पद्धतीने एकूण १३१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी १६ लाखांहून अधिक मतदार मतदान करत आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर सहा जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवार न राहिल्याने संबंधित उमेदवार बिनविरोध निवडून आले.
या पार्श्वभूमीवर मनसे आणि उद्धव सेनेने निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नावे ‘नोटा’सह मतपत्रिकेत असावीत, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र निवडणूक नियमांनुसार बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नावे मतपत्रिकेत समाविष्ट करता येत नसल्याने निवडणूक प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली. दरम्यान, विरोधकांनी गंभीर आरोप करत उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव, सत्तेचा गैरवापर, प्रशासकीय यंत्रणेचा हस्तक्षेप तसेच आर्थिक आमिषे दिल्याचा दावा केला आहे. काही प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
या सहा बिनविरोध निवडींमुळे ठाणे महापालिकेतील १३१ जागांपैकी प्रत्यक्ष मतदान १२५ जागांसाठीच होत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी सर्व १३१ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र बिनविरोध निवडींबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सुखदा मोरे, शीतल ढमाले, जयश्री फाटक, राम रेपाळे, एकता भोईर आणि सुलेखा चव्हाण यांचा समावेश आहे. एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या प्रतिनिधीशी बोलताना संबंधित उमेदवारांची नावे मतपत्रिकेत समाविष्ट करण्यात आली नसल्याची माहिती दिली.