सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 05:59 IST2026-01-10T05:59:07+5:302026-01-10T05:59:07+5:30
ठाण्यातील निवडणुकीचे वातावरण तापत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बॅनरवॉर सुरू झाले आहे.

सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यात शिंदेसेना आणि भाजपने विकासकामांना महत्त्व देणारे बॅनर लावले आहेत. परंतु, आता त्यांच्याच बॅनरच्या बाजूला किंबहुना शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी उध्दवसेना आणि मनसेनेही बॅनर लावून सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल केला आहे. त्यामुळे ठाण्यातील निवडणुकीचे वातावरण तापत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बॅनरवॉर सुरू झाले आहे.
‘शिंदेसेनेने जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण’ अशा आशयाच्या टॅगलाइनसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावले आहेत. भाजपकडून सुरुवातीला नमो भारत नमो ठाणे आणि विकासाला गती देणारा पर्याय एकच भाजप अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यावर युतीमधील वरिष्ठ आणि स्थानिक नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. हे बॅनर शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी लावले आहेत. स्वतंत्र बॅनरमुळे युतीतील समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच, संयुक्त होर्डिंगच्या माध्यमातून महायुती एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
उध्दवसेना आणि मनसेनेही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवक मीच, नगरसेविका मीच, आमदार मीच, मंत्री मीच बस झाली घराणेशाही, आता यातून बाहेर पडूया!, असा मजकूर झळकत असून, त्यावर दोनही पक्षांची चिन्हे आहेत. या आशयामुळे घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्याची चर्चा रंगली आहे.
शहरातील विविध भागांमध्ये रखडलेल्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरही बॅनर लावण्यात आले आहेत. स्वत:चे कॉम्प्लेक्स उभे राहतात, आमचा पुनर्विकास मात्र वर्षानुवर्षे रखडलेलाच, आता बदल हवा, अशा आशयाचे होर्डिंग तीन पेट्रोल पंप, मासुंदा तलाव, गोखले रोड आदी ठिकाणी झळकले आहेत. या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.