महायुती अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच हाेईल जागावाटप; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:57 IST2025-12-24T09:56:58+5:302025-12-24T09:57:33+5:30
आनंद आश्रम येथे शिंदेसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली. यावेळी म्हस्के यांनी हे भाष्य केले.

महायुती अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच हाेईल जागावाटप; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतला असून, युती अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच जागावाटपाची घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट मत शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी व्यक्त केले. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
आनंद आश्रम येथे शिंदेसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली. यावेळी म्हस्के यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले की, महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. सध्या विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, योग्यवेळी जागावाटप जाहीर होईल. युती आणि जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतात. सध्या प्रक्रिया सुरू असून, कुठेही जागावाटपाचा तिढा नाही. उमेदवार निवडताना संघटनात्मक काम, निवडून येण्याची क्षमता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद हे निकष असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे बंधूंना शुभेच्छा
ठाकरे बंधूंना एकत्र येण्याकरिता म्हस्के यांनी शुभेच्छा दिल्या. निवडणुकांच्या काळात अशा युती-आघाड्या होत असतात. याआधी उद्धवसेनेने काँग्रेसला जवळ केले, आता मनसेला जवळ करत आहेत. ही धरसोड वृत्ती जनतेच्या लक्षात आली आहे. काही जण केवळ त्यांचा फायदा घेत आहेत हे काँग्रेसच्याही लक्षात आले असेल. उद्धवसेनेकडे जनाधार नाही, हेही त्यांच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच ते मुंबईत स्वबळावर लढणार असे सांगताहेत, असे ते म्हणाले.
मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी हाच त्यांचा विचार
मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असा उद्धवसेनेचा दृष्टिकोन आहे. मुंबईबाहेर त्यांच्या नेत्यांनी कधी लक्ष दिले नाही. फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित करून सत्ता कशी मिळवायची, हाच त्यांचा एकमेव विचार असल्याचीही टीका त्यांनी केली.