सपतील इच्छुकांना धाडले काँग्रेसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:31 IST2025-12-31T15:31:32+5:302025-12-31T15:31:53+5:30
पालिकेत सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीत वाद उफाळून आल्याने त्याचा नेमका कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार हे निवडणूक निकालनंतर स्पष्ट होणार आहे.

सपतील इच्छुकांना धाडले काँग्रेसमध्ये
भिवंडी : समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आ. रईस शेख व समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू असीम आझमी या दोघांमधील संघर्षाचा फटका समाजवादी पक्षाला भिवंडीत बसला आहे. आ. शेख यांच्या मर्जीतील इच्छुक उमेदवारांना आझमी यांनी उमेदवारी नाकारल्याने शेख यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करत समाजवादीतील इच्छुकांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समाजवादीतील इच्छुकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
पालिकेत सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीत वाद उफाळून आल्याने त्याचा नेमका कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार हे निवडणूक निकालनंतर स्पष्ट होणार आहे.
भिवंडीत महायुती ५२ तर काँग्रेस ६४ जागा लढविणार
भिवंडी : भाजप-शिंदेसेना युती शहरात ५२ जागा लढवणार असून भाजप ३२ व शिंदेसेना २० जागा लढवणार आहे. तर काँग्रेस ६४ जागा, समाजवादी ६२ जागा लढवणार आहे.
उद्धवसेना व मनसे ५२ जागा लढवणार असून उद्धवसेना ४० तर मनसे १२ जागा लढवणार आहेत. राष्ट्रवादी
(शरद पवार) ४५ जागा तर राष्ट्रवादी (अजित पवार) ३४ जागा लढवणार असल्याची माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठाण्यात कॉंग्रेसने दिले ९५ उमेदवार
महाविकास आघाडीमध्ये बोलणी फिस्कटल्यानंतर स्वबळाचा नारा दिलेल्या कॉंग्रेसने ठाणे महापालिकेकरिता ९५ उमेदवार रिंगणात उतरवले.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेसने ठाण्यात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. सुरुवातीला ३५ जागांची मागणी केली होती. तडजोडीत त्यांनी २५ जागा तरी सोडाव्यात अशी भूमिका घेतली. कॉंग्रेसला १० जागांची ऑफर दिली.
ठाण्यात कॉंग्रेसचे अस्तित्व असल्याने कॉंग्रेसचा योग्य सन्मान करावा, अशी भूमिका शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी घेतली होती. अखेर महाविकास आघाडीतून फारकत घेत कॉंग्रेसने
९५ जागा लढविण्याचे जाहीर केले.