Ranganadar to contest in Thane? | निकालापर्यंत रंगतदार ठरणार ठाण्यातील लढत?
निकालापर्यंत रंगतदार ठरणार ठाण्यातील लढत?

अजित मांडके

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत अखेरच्या टप्प्यात रंगतदार झाली असून निकाल लागेपर्यंत या लढतीमधील रंगत अशीच टिकून राहील, अशी अपेक्षा आहे. शिक्षण, भ्रष्टाचार वगैरे मुद्दे निवडणुकीत चर्चेचे ठरले. आता मतदार कोणत्या निकषावर मतदान करतात, ते बघू. अर्थात, ठाणेकरांनी घराबाहेर पडून भरभरून मतदान करावे, हीच अपेक्षा आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आजच्या मतदानात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगल्याचे दिसून येणार आहे. राष्ट्रवादीचा ग्रासरूटवर जाऊन झालेला प्रचार, शिवसेनेच्या उमेदवाराचे शिक्षण, नंदलाल समितीने ठेवलेला ठपका अशा मुद्द्यांवर आरोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात लक्षवेधी ठरली. आपण मागील निवडणुकीपेक्षा जास्तीच्या मतांनी निवडून येऊ, असा आत्मविश्वास शिवसेनेच्या उमेदवाराने दाखवला आहे. त्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास खरा ठरणार की, राष्टÑवादीने या निवडणुकीत आणलेली रंगत निकालातही टिकून राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, निकाल काहीही लागो, ठाणेकर मतदारराजाने घरातून बाहेर पडून भरभरून आपले मत मतपेटीत टाकणे, ही सुदृढ लोकशाहीची गरज आहे. ठाणे हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पूर्वेतिहास पाहता, एकेकाळी कॉंग्रेसचे ठाण्यात वर्चस्व होते. या मतदारसंघाने कॉंग्रेसला कौल दिला होता. परंतु, १९७७ नंतर कॉंग्रेसला मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. त्यानंतर, १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर कॉंग्रेसने पुन्हा हा गड सर केला. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत कॉंग्रेस पिछाडीवर गेली, ती आजतागायत उभारी घेऊ शकलेली नाही. त्यानंतर, भाजप-शिवसेनेनेच या बालेकिल्ल्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसला ठाण्याने नाकारले असले, तरी राष्ट्रवादीने मात्र मधल्या काळात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ठाणे लोकसभेवर कब्जा केला होता. त्यानंतर, झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत मोदीलाटेमुळे शिवसेनेने हा बालेकिल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.

आता २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगत आहे. विधानसभेत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. परंतु, मागील वेळी आणि आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्यात युती झाली आहे. त्यामुळे ‘पुन्हा मोदी’, असा प्रचार करत शिवसेनेने मोदींसाठी मते मागितली. राष्ट्रवादीकडून सोशल मीडिया, होर्र्डिंग्ज आदींच्या माध्यमातून शिवसेनेवर जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला दिसून आला. सुरुवातीलाच शिक्षणाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, नंदलाल समितीने ठेवलेल्या ठपक्याची होर्डिंग्ज लावून हा मुद्दा प्रचारात तापवला. शिवसेनेच्या उमेदवाराने प्रसिद्ध केलेला वचननामा हा पालिकेच्या कामांचाच वचननामा असल्याचीही टीका केली. राष्ट्रवादीकडून होत असलेल्या टीकेला, आरोपांना शिवसेनेकडून म्हणावे तसे चोख उत्तर दिले गेले नाही. शिवसेना आपला प्रचार करत राहिली व मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ, असा दावा शिवसेनेच्या मंडळींकडून केला गेला. प्रचार रॅली, चौकसभा, कार्यकर्त्यांच्या मीटिंग आदींवरच या निवडणुकीत अधिक भर दिला गेल्याचे दिसून आले. याशिवाय, प्रचारासाठी सोशल मीडिया हे सुद्धा महत्त्वाचे माध्यम ठरल्याचे दिसून आले. शिवसेनेकडून केल्या गेलेल्या दाव्याला सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादीकडून उत्तर आणि राष्ट्रवादीने उपस्थित केलेल्या मुद्यांवर शिवसेनेकडून प्रत्युत्तर, अशी जुगलबंदी दिसली. त्यामुळे निवडणुकीतील रस्त्यावरची लढाई ही सोशल मीडियामध्येही तितकीच रंगल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेकडून विकासाचे मुद्दे दाखवण्यात येत होते, तर राष्ट्रवादीकडून विकासाचे मुद्दे खोडून काढले जात होते. त्यामुळेही निवडणूक रंगतदार ठरली. दोन्ही पक्षांकडून महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा ठाण्यात झाल्या. मात्र, त्याने फारशी रंगत प्रचारात आल्याचे दिसून आले नाही. त्यापलीकडे जनतेला काय हवे आहे, काय देणार, विकासाचे मुद्दे काय असतील, या कोणत्याही मुद्यावर चर्चा होताना दिसली नाही. असो. आता ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार आहे. या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी म्हणजे आजच मतपेटीत बंद होणार आहे. ठाण्यातील एकूण मतदारांपैकी तीन लाखांहून अधिक मतदार हे तरुण आहेत. त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत ५०.८७ टक्के इतक्या कमी मतदानाची नोंद झाली होती. मागील काही निवडणुकांपेक्षा २०१४ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले होते. या निवडणुकीत मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती करण्यात आली होती. आता मतदानाचा टक्का वाढणार की घटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदानाचा टक्का वाढला, तर कोणाच्या फायद्याचा ठरणार आणि टक्का घटला तर त्याचा फटका कोणाला बसणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Web Title: Ranganadar to contest in Thane?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.