‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 07:51 IST2026-01-02T07:49:40+5:302026-01-02T07:51:07+5:30
...निवडणूक अधिकारी यात त्यांना साथ देत असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी गुरुवारी केला.

‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
ठाणे : कल्याण-डोंबिवलीत भाजप व शिंदेसेनेने अनुक्रमे पाच व चार उमेदवार बिनविरोध निवडून आणले. ठाण्यातही विरोधकांचे उमेदवारी अर्ज हेतुत: बाद ठरवून आपले उमेदवार विजयी करण्याचे भाजप व शिंदेसेनेने सुरू केले आहे. निवडणूक अधिकारी यात त्यांना साथ देत असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी गुरुवारी केला.
जाधव म्हणाले की, उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्यापूर्वी ते डिस्प्ले करावे लागतात. सत्ताधारी पक्षाच्या व मुख्यत्वे शिंदेसेनेच्या उमेदवारांचे अर्ज सकाळी ११ वाजता डिस्प्ले केले नाहीत. उमेदवारी अर्जात रिकाम्या जागा ठेवल्या असतील तर अर्ज बाद होतो. शिंदेसेनेच्या अनेक उमेदवारांनी पूर्ण अर्ज भरलेले नाहीत. त्यावर आक्षेप घेऊनही त्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. सत्ताधाऱ्यांचा एकही अर्ज बाद ठरलेला नसताना विरोधकांचे अनेक अर्ज बाद केले. गेली १० वर्षे लोक या निवडणुकीची प्रतीक्षा करत होते. मात्र भ्रष्ट यंत्रणा सत्ताधाऱ्यांना उघड-उघड सहकार्य करीत असल्याचे जाधव म्हणाले.पक्षपाती कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी मनसेने महापालिका मुख्यालयावर धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला.
निवडणुकीसाठी मनसेकडून २८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बुधवारी या अर्ज छाननी निवडणूक कार्यालयात पार पडली. वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ मधील उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्या अधिपत्याखाली झाली. यावेळी सत्ताधारी पक्षातील उमेदवारांच्या अर्जांत गंभीर त्रुटी असताना ते बाद न करता मनसे, विरोधी पक्ष आणि काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज किरकोळ कारणांवरून अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप आहे.
चौकशीचे दिले आश्वासन
वागळे प्रभाग १८ मध्ये शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात मनसेच्या प्राची घाडगे उभ्या असताना, ‘निरंक’ असा उल्लेख न केल्याचे कारण देत घाडगे यांचा अर्ज बाद केल्याचा दावा मनसेने केला. मात्र, इतर ठिकाणी शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या अर्जांमध्ये रकाने रिकामे असतानाही कारवाई करण्यात आली नसल्याचेही जाधव यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे व उपायुक्त उमेश बिरारी यांनी चौकशीचे आश्वासन दिले.